नगरपालिका निवडणूक पराभवावरून "राष्टवादी'त रंगला कलगीतुरा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

औरंगाबाद - नगरपालिका निवडणुकीतील पराभवावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत कलगीतुरा रंगला आहे. निवडणूक प्रभारी माजी मंत्री सुरेश धस यांच्याबद्दल चुकीचे विधान करण्याचा अधिकार आमदार सतीश चव्हाण यांना कुणी दिला, असा प्रश्‍न शनिवारी (ता. 24) प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना यांनी काही पदाधिकाऱ्यांना सोबत घेत उपस्थित केला.

औरंगाबाद - नगरपालिका निवडणुकीतील पराभवावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत कलगीतुरा रंगला आहे. निवडणूक प्रभारी माजी मंत्री सुरेश धस यांच्याबद्दल चुकीचे विधान करण्याचा अधिकार आमदार सतीश चव्हाण यांना कुणी दिला, असा प्रश्‍न शनिवारी (ता. 24) प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना यांनी काही पदाधिकाऱ्यांना सोबत घेत उपस्थित केला.

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पराभव झाला. या निवडणुकीचे प्रभारी म्हणून माजी राज्यमंत्री श्री. धस यांच्याकडे जबाबदारी होती. दरम्यान, याबद्दल आमदार चव्हाण यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्याचे माध्यमातून पुढे येताच कदीर मौलाना यांनी राष्ट्रवादी भवन येथे पत्रपरिषद बोलावली. यात ते म्हणाले, ""आमदार चव्हाण यांना कुणाचेही वर्चस्व सहन होत नाही. मात्र, पक्षात असे कुणा एकाचे वर्चस्व आम्ही सहन करणार नाही. आज पक्षात कुणी यायला तयार होत नाही.'' कन्नड येथील उदयसिंग राजपूत म्हणाले, 'पक्षात काय सुरू आहे, हे कळत नाही. वरिष्ठ नेते मतदारसंघात येत असताना आपणास माहिती दिली जात नाही. चव्हाण यांच्या एकाही माणसाने निवडणुकीत माझे काम केले नाही. आपापसातील मतभेदांमुळेच आपण पराभूत झालो आहोत.'' माजी आमदार संजय वाघचौरे म्हणाले, 'उस्मानाबाद, तुळजापूर येथील लोकांनी आमच्यावर अन्याय केला आहे.

कुणालाही मोठे होऊ द्यायचे नाही, असेच त्यांचे धोरण आहे.'' पक्षात सुधारणा गरजेच्या असून, आपल्याला त्रास दिल्याचा आरोप त्यांनी केला. सध्या जिल्हाध्यक्षपद रिक्‍त असून आपण इच्छुक आहेत का, असा प्रश्‍न त्यांना विचारला असता, "जबाबदारी दिली तर नक्‍की सांभाळू,' असे उत्तर श्री. वाघचौरे यांनी दिले. यावेळी नीलेश राऊत, माणिकराव शिंदे, शैलेश चौधरी, राहुल तायडे, अभिषेक देशमुख, संदीप शेळके, शेख शफीक, विजय साळवे, अमोल ओझालवार, अब्दुल आलीम, प्रतिभा वैद्य, शमा परवीन, लता पाटील उपस्थित होते.

नगरपालिका निवडणुकीत ज्यांनी उमेदवारीचे तिकीट वाटप केले, त्या पदाधिकाऱ्यांनीच खरे तर निवडणुकीतील दारुण पराभवाचे आत्मचिंतन करायला हवे.
- आमदार सतीश चव्हाण

Web Title: disturbance in ncp by municipal election