पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार टपाली मताचा अधिकार

प्रशांत शेटे
Tuesday, 3 November 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदवीधर निवडणुकीसाठी ८० वर्षांच्या पुढील तसेच दिव्यांग व्यक्ती, कोविडबाधित अथवा संशयित मतदारांना निवडणूक कर्मचारी, पोलिस यांच्याप्रमाणे टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे.

चाकूर (जि.लातूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदवीधर निवडणुकीसाठी ८० वर्षांच्या पुढील तसेच दिव्यांग व्यक्ती, कोविडबाधित अथवा संशयित मतदारांना निवडणूक कर्मचारी, पोलिस यांच्याप्रमाणे टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे. राज्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरूवात झाली आहे. भारत निवडणुक आयोगाने सार्वत्रीक निवडणुकीत ८० वर्षांवरील मतदार तसेच दिव्यांग व्यक्ती आणि कोविड बाधित अथवा संशयित मतदार टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यास पात्र असल्याचे अधिसूचित केले आहे.

लातूर जिल्ह्यातील गावांमध्ये होणार खुल्या व्यायामशाळा, राज्यमंत्र्यांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

कोरोनामुळे देशातील निवडणुक पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सध्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली असून एक डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी लातूर जिल्ह्यात २९ हजार ६६१ पुरूष, आठ हजार ५३५ स्त्रिया व इतर दोन मतदार आहेत. ८८ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींना घराच्या बाहेर किंवा गर्दीच्या ठिकाणी येऊ नयेत अशा सूचना आहेत. त्यामुळे निवडणुक आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे.

टपाली मतदानासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वंतत्र कक्षाची स्थापना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टपाली मतपत्रिका मिळणेसाठी पात्र असलेले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांची नावे वेगळी काढली जाणार आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत निवडणुक कर्मचारी, पोलीस यांनाच टपाली मताचा अधिकार मिळत असतो. कोरोनाच्या प्रादूर्भावापासून बचावासाठी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना ही सवलत मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केलं जात आहे.

 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीविरुद्ध भाजप! राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांना हॅट्ट्रीकची संधी

 

निवडणुक आयोगाच्या निर्दशाप्रमाणे तालुक्यात ८० वर्षांच्या पुढील दोन व दिव्यांग ६ मतदार आहेत. त्यांच्या वेगळ्या नोंदी घेण्यात आल्या असून पुढील सुचनेनुसार त्यांना मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे.
- डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार, चाकूर

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Divyang, Senior Citizens Can Post Voting In Graduate Constituency Election