माणुसकीमुळे उजळली वंचितांची दिवाळी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

जालना : सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्तींकडून फराळाचे वाटप 

जालना -  सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी शहरातील सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्ती सरसावल्या आहेत. ठिकठिकाणी गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यामुळे अनेकांची दिवाळी आनंदमय बनली आहे. 

अमृतवेला परिवार, सिंधी पंचायतीचा पुढाकार 
शहरात वस्त्यांवर- पालात आणि रस्त्याच्या कडेला घर करून राहणाऱ्यांच्या घरात दिवाळीचा सण साजरा होत नाही. त्यांच्या घरातही दिवाळी साजरी झाली पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसला पाहिजे. या हेतूने अमृतवेला परिवार व सिंधी पंचायत यांनी हा दिवाळी फराळ वाटपाचा उपक्रम राबवला आहे. शहरातील आझादनगर, भीमनगर, आनंदनगर, नूतन वसाहत, इंदिरानगर, गुरुगोविंदसिंगनगर, सिद्धार्थनगर, इंदेवाडी, साठेनगर, म्हाडा कॉलनी, चंदनझिरा परिसर, क्रांतीनगर व संजयनगरसह अनेक वस्त्यांमधील 900 जणांना मिठाई, लाडू, बिस्कीट, पणती असे साहित्य वितरण केले. समाजातील सधन व्यक्तींनी गरिबाच्या घरी जाऊन मिठाई व दिवाळी फराळ वाटप करून दिवाळी आनंदाने साजरी करण्याचे आवाहनही अमृतवेला परिवार आणि पूज्य सिंधी पंचायतीच्या वतीने करण्यात आले. 

लायन्स क्‍लबकडून फराळ 
गोरगरीब व गरजू लोकांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने लायन्स क्‍लब ऑफ जालनातर्फे "खुशियो के पल' या कार्यक्रमाच्या माध्यमातून बेघर, गरजू, गरीब कुटुंबीयांना शनिवारी (ता.26) दिवाळी फराळाचे वाटप केले. 
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे व सफल सीड्‌सचे संचालक कमल झुनझुनवाला यांच्या हस्ते 53 गरीब व गरजू महिला व पुरुषांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी लायन्स क्‍लबचे अध्यक्ष श्‍याम लोया, सचिव मीनाक्षी दाड, पुरुषोत्तम जयपुरिया, अतुल लड्डा, प्रकल्प प्रमुख राधेश्‍याम टिबडेवाल यांच्यासह आदींनी मदत केली. जमा झालेल्या मदतीतून गरजू महिलांना साड्या, मिठाई, तेल, पणती, फटाके, साबण, साडी, चादर असे साहित्य वाटप करण्यात आले. यात दिव्यांग व्यक्तींचाही समावेश होता. या उपक्रमासाठी लायन्स क्‍लबच्या सचिव मीनाक्षी दाड यांनी परिश्रम घेतले. 

मैत्र मांदियाळीतर्फे फराळ वाटप उपक्रम 
असाध्य रोगाने ग्रस्त असलेली मुले शहरातील विहान प्रकल्पामध्ये उपचार घेण्यासाठी येतात. मैत्र मांदियाळी या सेवाभावी संस्थेतर्फे शंभर मुलांना फराळाचे वाटप करण्यात आले. यासाठी अंबड येथील नीलेश लोहिया, सुनील मावकर यांनी आर्थिक मदत केली आहे. 

लायन्स क्‍लब ऑफ जालनातर्फे दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात. आर्थिक परिस्थितीमुळे घरात रोजचे जेवणदेखील व्यवस्थित मिळत नाही. अशांच्या घरात दिवाळीच्या वेळेस गोडधोड अन्नपदार्थ कुठून येणार, असा प्रश्न आमच्यासमोर होता. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून गरीब, गरजू कुटुंबीयांना फराळ व साहित्य देऊन दिवाळीचा आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे.  
मीनाक्षी दाड, सचिव, 
लायन्स क्‍लब ऑफ जालना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali