दिवाळीनिमित्त बाजारात खुळखुळणार कोट्यवधी रुपये

शेखलाल शेख 
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

कामगारांना मिळणार १७५ कोटींचा बोनस​

कामगारांना मिळणार १७५ कोटींचा बोनस​

औरंगाबाद - दिवाळीनिमित्त यंदा किमान साडेतीन हजार रुपयांपासून ४५ हजार रुपयांपर्यंतचा बोनस उद्योगांकडून दिला जाण्याची शक्‍यता आहे. केंद्र सरकारने बोनस कायद्यात बदल केला आहे. त्यानुसारच बोनस मिळण्याची अपेक्षा कामगारांना आहे. मात्र, वर्ष २०१५-१६ च्या बोनसचे अद्यापही वाटप सुरू झालेले नाही. नवीन बोनस कायद्यानुसार बोनस वाटप झाले तर यावर्षी दिवाळीत हा आकडा जवळपास ४२० कोटी रुपयांच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. जर नवीन बोनस कायद्यानुसार बोनस वाटप झाला नाही तरी कामगार, कर्मचाऱ्यांना किमान १७५ कोटी रुपये मिळण्याची शक्‍यता आहे. मागील वर्षी कामगार, कर्मचाऱ्यांना दीडशे कोटींच्या जवळपास बोनस वाटप झाला होता. 
 

सकारात्मक चर्चा होऊन बोनस निश्‍चिती
दिवाळी बोनस म्हटले, की पूर्वी कामगार व व्यवस्थापन यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झडत होत्या. कामगार, कर्मचाऱ्यांना बोनस किती असावा यावरून अनेकदा वाद व्हायचे. कधीकधी तर संपही व्हायचा. अलीकडच्या काळात हे चित्र औरंगाबादच्या उद्योगक्षेत्रात बदलले आहे. कामगार संघटना आणि व्यवस्थापनात बोनससंदर्भात सकारात्मक चर्चा होऊन बोनस निश्‍चित होत असतो. काही कामगार संघटना व व्यवस्थापनात करार करतानाच बोनसचा उल्लेख केला जातो. कामगार कायद्यानुसार किमान ते कमाल बोनस मर्यादेनुसार एकतर बोनस वाटप केला जातो किंवा व्यवस्थापन व कामगार यांच्यात समन्वयाने बोनसची रक्कम ठरवून वितरित केली जाते. शिवाय कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही काही प्रमाणात ठराविक रक्कम बोनस दिला जातो. यावर्षी दिवाळीनिमित्त कोट्यवधी रुपयांच्या बोनसची रक्कम खुळखुळणार आहे. 

 

उद्योगक्षेत्रातून कोट्यवधींचा बोनस
वाळूज, पैठण, चितेगाव, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा, शेंद्रा औद्योगिक वसाहत कारखान्यात जवळपास एक लाख कायम, तर दीड लाख कंत्राटी कामगार उत्पादन विभागात नियमित काम करतात. या कामगारांना बोनस कायदा लागू आहे. कायद्यानुसार कायम व कंत्राटी कामगारांना किमान बोनस सात हजार, तर कमाल बोनस १६ हजार ८०० रुपये मिळण्याची शक्‍यता आहे. हा बोनस दिवाळीपूर्वी जवळपास पाच ते आठ दिवस अगोदर कामगारांना दिला जातो. काही उद्योगांत दोन ते तीन दिवस अगोदर दिला जातो. कारखान्यात काही कंपन्यांनी तर ४५ हजार रुपयांपर्यंत बोनस दिला. काहींनी कामगार कायद्यानुसार पगाराच्या तुलनेत १० ते २० टक्के यादरम्यान किंवा एक पगार बोनस वाटप करण्याचे ठरविले आहे.

औरंगाबादेतील मोठे उद्योग म्हणून ख्याती असलेल्या उद्योगांनी हेच धोरण स्वीकारलेले आहे. 
 

संघटित कामगारांनाही मिळतो बोसन, मात्र कमी
बहुसंख्य कंपन्यांच्या करारामध्येच बोनसचा उल्लेख केला जात असल्याने आपल्याला किती बोनस मिळेल याची कामगार, कर्मचाऱ्यांना आधीच माहिती असते. करारानुसार शक्‍यतो २० टक्के बोनस मिळतो. यामध्ये कामगारांना ९ ते १६ हजार रुपयांपर्यंत सर्वसाधारणपणे रक्कम मिळू शकते. वाळूज, चिकलठाणा, रेल्वेस्थानक, चितेगाव परिसर, तसेच जिल्ह्यातील लघू, मध्यम व मोठ्या अशा जवळपास साडेचार हजारांपेक्षा जास्त उद्योगांतील हजारो कायम कामगारांना कोट्यवधी रुपयांपर्यंत बोनस मिळेल. शिवाय अनेक कंपन्यांत अंतर्गत संघटना आहेत.

 

अशा कामगारांनाही कोट्यवधी रुपये बोनस मिळणार आहे. नवीन बोनस कायद्याप्रमाणे कामगारांना बोनस दिला तर १७५ ते ४२० कोटी रुपयांपर्यंत बोनस वाटप होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, कामगार संघटनांनी असंघटित, कंत्राटी कामगारांना किमान सात हजार रुपये बोनस तरी द्यावा, अशी मागणी केली आहे. अनेक ठिकाणी कंत्राटी कामगारांना किमान बोनस देय असूनही त्यांना तो मिळत नाही.
 

अलीकडे समान कामास समान दाम हे तत्त्व पुढे आले म्हणून नवीन बोनस कायद्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी कामगार संघटनांकडून केली जात आहे. 
 

कामगारांना नवीन बोनस कायद्यानुसार जास्तीत जास्त बोनस मिळावा, यासाठी आमचा प्रयत्न आहे. यावर्षी केंद्राच्या नवीन धोरणानुसार बोनस वाटप झाला तर औद्योगिक क्षेत्रातील कामागारांना जवळपास १७५ ते ४२० कोटी रुपयांचा बोनस वाटप होण्याची शक्‍यता आहे. सीटूच्या जवळपास ७० कंपन्यांमध्ये युनियन असून, यामध्ये कामगारांना बोनस मिळेल; तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ देण्यासाठी आमचा लढा सुरूच असतो.
- उद्धव भवलकर, नेते, सीटू

नवीन बोनस कायदा झालेला असल्याने कामगारांना जास्तीचा बोनस मिळेल. बहुतांश कंपन्यांच्या करारामध्येच वाढीवा पगारासोबत याचा उल्लेख केलेला असतो. आयटकची १७ कंपन्यांमध्ये युनियन आहे. 
- डॉ. भालचंद्र कानगो, नेते आयटक

Web Title: diwali bonus for worker