यंदा 'दिवाळी पहाट'चा खंड! बेसूर कोरोनामुळे कानसेनांचा हिरमोड!  

सुहास सदाव्रते
Wednesday, 4 November 2020

बेसूर कोरोनामुळे जालन्यातील कानसेनांचा हिरमोड 

जालना : थंडीत प्रकाश सणाच्या पहाटे जाणकार कानसेनांना गीत-संगीतमय ' दिवाळी पहाट ' नजराणा यंदा कोरोनामुळे मिळणार नाही. दिवाळी पहाटची सुरावट गुंजणार नसल्याने जाणकारांचा हिरमोड झाला असल्याची भावना व्यक्त होत आहे, हे विशेष.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
जालन्यात पुणे मुंबईच्या धर्तीवर 'दिवाळी पहाट ' कार्यक्रमाची सुरुवात एक तपापूर्वी करण्यात आली होती.जुना जालन्यातील युवा मित्रांनी संस्कृती मंच स्थापन करून जालनेकर रसिकांची दिवाळी सूरमयी करण्यासाठी विशेष गीत-संगीतमय कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करते. प्रकाश सणाचा उत्साह द्विगुणित करीत एकापेक्षा एक सरस मैफलीचा आनंद जालनेकरांनी घेतला. बारा वर्षांपासून सातत्य कायम राखत रसिक दिवाळी पहाट कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत. परंतु यंदा मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गजन्य परिस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले आहे.यातच अनेक जाहीर कार्यक्रम निर्बंध ठेवण्यात आले आहे.यामुळेच यंदा दिवाळी पहाटची सुरावट ऐकण्यास जालनेकर रसिक मुकणार आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दिवाळी एका आठवड्यावर येऊन ठेपली असली तरी दरवर्षी होणार गीत-संगीतमय कार्यक्रम नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. संस्कृती मंचने ' दिवाळी पहाट ' च्या माध्यमातून राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या प्रमुख उपस्थिती व कीर्तनाने कार्यक्रमाचा शुभारंभ केला होता. यानंतर गायक सचिन करंबळेकर चैतन्य कुलकर्णी यांचा कार्यक्रम झाला. प्रसिद्ध भजन सम्राट गायक अजित कडकडे यांनी जालनेकरांची दिवाळी पहाट अविस्मरणीय ठरविली होती. पं. राजा काळे, महेश मुतालिक व अनुजा वर्तक, अनिरुद्ध व रसिका जोशी यांचीही हजेरी होती. जालनेकरांनी शास्त्रीय गायक शौनक अभिषेकी व रघुनंदन पणशीकर यांची जुगलबंदीने मंत्रमुग्ध झाल्याचा अनुभव घेतला. मंदार आपटे व कल्याणी देशपांडे,धनश्री देशपांडे, नंदिनी गायकवाड व भगिनी यांच्या सुरेल गायनाने दिवाळी पहाट अधिक रंगली होती. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

संस्कृती मंचचे पदाधिकारी किशोर देशपांडे, मकरंद दाभाडकर, गिरीश राखे , दिलीप देशपांडे , सुनील कुलकर्णी, धनंजय पाटील , प्रकाश आचार्य , जयंत दाभाडकर, संजय देशपांडे, राजेंद्र देशपांडे व राजेश कल्याण या मित्रांनी बारा वर्षांपासून दिवाळी पहाट आनंदमयी करण्याचा प्रयत्न करतात. उद्योजक सुनील रायठ्ठठा, विनयकुमार देशपांडे, डॉ. माधव अंबेकर , डॉ.अमित काबरा, सुरेश मगरे, प्रसाद राव याचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शनाने दिवाळी पहाट आनंद जालनेकरांना देऊ शकलो, अशी प्रतिक्रिया पदाधिकारी किशोर देशपांडे यांनी दिली. 

 

जालनेकरांना पुणे मुंबईच्या धर्तीवर गीत संगीताची मेजवानी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.एक तपापासून दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करण्यात आले.यंदा निर्बंध असल्याने दिवाळी पहाटविना सुने सुने वाटेल. 
- अनिल कुलकर्णी, पदाधिकारी,संस्कृती मंच जालना 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali Pahat program will be closed this year