डॉक्‍टर-रुग्णांचे नाते व्हावे अधिक दृढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

यामुळे हा दिवस 
डॉक्‍टरांनी समाजासाठी केलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी नॅशनल डॉक्‍टर डे असतो. पश्‍चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांनी जीवनभर वैद्यकीय चिकित्सक सेवाभावाने केलेल्या कामाचा गौरव व कामाचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय डॉक्‍टरांचा दिन साजरा केला जातो. सेवाभावी डॉक्‍टरांचे समाजातील स्थान बळकट आणि त्यांना अजून समाजाभिमुख समर्पित भावाने कामास प्रोत्साहित करण्यासाठी वर्ष १९९१ पासून हा दिवस केंद्र शासनाने सुरू केला आहे.

औरंगाबाद - जीवदान देणाऱ्या डॉक्‍टरांना आजही देव मानल्या जाते. सद्यःस्थितीत डॉक्‍टर-रुग्ण संवाद, डॉक्‍टर-रुग्ण नात्यातील विश्‍वास हरवत चालला आहे. डॉक्‍टरांचे महत्त्व, भूमिका, जबाबदाऱ्यासह समाजाप्रति समर्पित भावनेला प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी एक जुलै हा देशभरात राष्ट्रीय डॉक्‍टर दिन म्हणून साजरा केला जातो; पण दिवसेंदिवस डॉक्‍टरांवर हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. त्या थांबण्यासाठी डॉक्‍टर-रुग्ण संवाद वाढण्याची अपेक्षा वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली. 

आधीच्या डॉक्‍टरांची प्रॅक्‍टिस आणि आताच्या प्रॅक्‍टिसमध्ये फार फरक नाही; मात्र समाजात बदल झालेला दिसतो. अपेक्षा वाढल्या; पण त्यांच्याकडे वेळ नाही. प्रत्येकजण व्यस्त आहे. लवकर ट्रीटमेंट व्हावी असे सर्वांना वाटते. रुग्ण नातेवाइकांचे मानसिक स्थैर्य नाही. नोकरी, पैसा, आंतरवैयक्तिक तणावातून मनाची शक्ती घालवली जाते. आपल्या रुग्णासोबत अघटित घडल्यावर प्रचंड राग त्यामुळेच येतो अन्‌ तो डॉक्‍टरांवर काढला जातो.

त्यामुळे संवाद दुतर्फा झाला पाहिजे. त्या संवादाच्या प्रतिसादाची दोन्ही बाजूने वाट पाहिली पाहिजे. पूर्वी नातेवाइकांकडे वेळ होता. विश्‍वास होता.

आता साशंकता निर्माण झाली आहे. चांगल्यातली चांगली ट्रीटमेंट मिळावी असा प्रत्येकाचा आग्रह रास्त आहे; पण डॉक्‍टर देव नाही. तो फक्त रिलीफ देऊन मार्गदर्शन देत उपचार करतो. हे समाजाने समजून घेण्याची गरज घाटी रुग्णालयाच्या मेडिसीन विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य म्हणाल्या.

अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत थोरात म्हणाले, ‘‘पूर्वी डॉक्‍टर अन्‌ रुग्णांचे नाते दृढ होते. आता रुग्ण नातेवाइकांना पटकन राग येतो. लवकर म्हणजे पाच मिनिटांत उपचार झाले पाहिजे. डॉक्‍टरांनी तसेच रुग्ण नातेवाइकांनीही एकमेकांना समजून घेतले पाहिजे. संवाद वाढवला पाहिजे.

रुग्णांची संख्या वाढली आहे अन्‌ डॉक्‍टरांच्या कमी संख्येमुळेही रुग्णसेवेवर ताण येतो. त्यात वादला सुरवात होते. हे सर्व थांबणेच समाजहिताचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors Day Patient Relation