दुष्काळग्रस्त मराठवाडा आता लघुपटात

सुशांत सांगवे
मंगळवार, 16 एप्रिल 2019

दुष्काळाची दाहकता ही त्या भागात गेल्याशिवाय, तिथे राहिल्याशिवाय समजत नाही. त्यामुळेच एक तरुण साडेतीनशे किलोमीटरवरून इथे आला. त्याने मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त लोकांचं जगणं, त्यांचं लढणं, त्यांचं हरणं आणि त्यांचं मरणंसुद्धा चित्रित करून त्यावर लघुपट तयार केला आहे.

लातूर - दुष्काळाची दाहकता ही त्या भागात गेल्याशिवाय, तिथे राहिल्याशिवाय समजत नाही. त्यामुळेच एक तरुण साडेतीनशे किलोमीटरवरून इथे आला. त्याने मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त लोकांचं जगणं, त्यांचं लढणं, त्यांचं हरणं आणि त्यांचं मरणंसुद्धा चित्रित करून त्यावर लघुपट तयार केला आहे. वेळीच जागरूक झालो तर हे निराशाजनक चित्र आपल्याला बदलता येईल, असा सकारात्मक संदेशही त्याने लघुपटाच्या माध्यमातून दिला आहे.

भास्कर नागमोडे असे या तरुणाचे नाव आहे. ते मूळचे लातूर जिल्ह्यातील निलंग्याचे. पण शिक्षण, नोकरी, चित्रपट दिग्दर्शनाची आवड म्हणून गेल्या काही वर्षांपासून ते पुण्यात स्थायिक झाले आहेत. "देऊळ बंद' आणि अलीकडेच आलेल्या "मुळशी पॅटर्न' चित्रपटाचे दिग्दर्शक (तांत्रिक) असलेले नागमोडे यांनी मराठवाड्यातील 2016 चा दुष्काळ आपल्या "मराठवाडा' या लघुपटात मांडला आहे. आजही मराठवाड्यात तशीच स्थिती आहे. त्यामुळे त्यांनी आपला लघुपट दोनच दिवसांपूर्वी यू-ट्यूबवर लॉंच केला आहे.

नागमोडे म्हणाले, अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून मी लातुरातून पुण्यात आलो. "किर्लोस्कर'मध्ये नोकरी लागली; पण काही वर्षांनी ती सोडली आणि "एफटीआयआय'मध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर याच क्षेत्रात रमलो. सुरवातीला काही वर्षे दाक्षिणात्य चित्रपटांसाठी काम करता आले. आता मराठी चित्रपटांसाठी टेक्‍निकल डायरेक्‍टर म्हणून काम करत आहे. 2016 चा दुष्काळ दररोजच वाचनात येऊ लागला. त्यामुळे एके दिवशी मी एकटाच कॅमेरा घेऊन मराठवाड्यात आलो. जवळजवळ सर्वच दुष्काळी भागांत फिरलो. रेल्वेने पाणी आणले जातेय, घागरभर पाण्यासाठी वणवण, कोरड्याठाक विहिरी, प्राणी-पक्षी तहानेने व्याकूळ, शेताचे ओसाड माळरान, शेतकरी आत्महत्या असे चित्र तर फारच विदारक होते. ते सगळे माझ्या लघुपटात पाहायला मिळेल. लघुपटात संवाद नाहीत. संगीत हीच लघुपटाची भाषा आहे. कारण ती जगभरातील प्रेक्षकांना समजते.

Web Title: Documentary on Marathwada Drought Affected Bhaskar Nagmode