औरंगाबाद शहरावर भटकी दहशत

माधव इतबारे
रविवार, 15 सप्टेंबर 2019

कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रियेवर पाच वर्षांत 60 लाखांची उधळपट्टी 

औरंगाबाद - शहरातील भटक्‍या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे दरवर्षी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. गेल्या पाच वर्षांत सात हजार 929 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, 59 लाख 29 हजार 225 रुपये खर्च करण्यात आले; मात्र शस्त्रक्रियेचे प्रमाण कुत्र्यांच्या संख्येचा विचार करता नगण्य असल्यामुळे कुत्र्यांच्या संख्येत
वर्षानुवर्षे वाढच होत आहे. आजघडीला 30 ते 35 हजार मोकाट कुत्री शहरात असल्याचा प्रशासनाचा अंदाज असून, या कुत्र्यांनी शहरवासीयांवर हल्ले करून दहशत निर्माण केली आहे.कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन वर्षांत दोघांचे बळी गेल्यानंतरही महापालिकेला जाग आलेली नाही, हे विशेष. 

शहरातील भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मुख्य रस्ते, चौक, मांसविक्रीची दुकाने असलेल्या भागात तर नागरिकांना रात्रीचे सोडा, दिवसाही घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. मोकाट कुत्रे विशेषतः लहान मुले, वृद्धांवर हल्ले करून त्यांना जखमी करीत आहेत. मुकुंदवाडी "जे' सेक्‍टर येथील चिमुकली आकांक्षा राजू वावरे हिचा मोकाट कुत्रे
चावल्याने बुधवारी (ता. 11) मृत्यू झाला.  त्यामुळे कुत्र्यांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे गेल्या काही वर्षांपासून नसबंदी शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. मात्र कुत्र्यांची आजघडीला असलेली संख्या व होणाऱ्या शस्त्रक्रिया यात मोठी तफावत असल्याने कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मुख्य पशुसंवर्धन अधिकारी बी. एस. नाईकवाडे यांनी कुत्र्यांची संख्या तब्बल 30 ते 35 हजारांच्या घरात असल्याचा खुलासा केला होता. कुत्र्यांच्या नसबंदीवर दरवर्षी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात असताना संख्या का कमी होत नाही, हा संशोधनाचा विषय बनला आहे. महापालिकेने गेल्या सहा वर्षांत केवळ सात हजार 929 कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यामुळे उर्वरित कुत्र्यांचे प्रजनन झपाट्याने वाढत असून, एक कुत्री वर्षाला पाच ते सात पिलांना जन्म देते. त्यामुळे कुत्र्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, मोठे झालेले कुत्रे अन्नपाणी मिळत नसल्याने थेट नागरिकांवर हल्ले करीत आहेत. 

2001 पासून आली बंदी 
शहरातील कुत्र्यांचा प्रश्‍न 2001 पासून गंभीर बनला आहे. डॉग रूल 2001 नुसार ऍनिमल वेलफेअर बोर्डाने कुत्रे मारण्यास बंदी घातली. त्यापूर्वी कुत्र्यांचा त्रास वाढला की, महापालिकेतर्फे कुत्र्यांवर सर्रास विषप्रयोग केला जात होता; मात्र त्यावर प्राणिमित्रांचा आक्षेप होता. त्यामुळे कुत्रे मारण्यास बंदी घालण्यात आली. 

अनेकांचे घेतले बळी 
शहरातील मोकाट कुत्र्यांनी आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहेत. 2006-07 मध्ये मुकुंदवाडी भागात एका मुलाला कुत्रा चावल्यानंतर घाटीत त्याचा मृत्यू झाला होता. 2019 मध्ये मुकुंदवाडीतच बालिकेचा कुत्र्याने बळी घेतला. गतवर्षी जुन्या शहरात एका मुलाचा मृत्यू झाला होता. शेळ्या, वासरांवर हल्ले करून कुत्र्यांनी दहशत माजविली आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dog Terror in Aurangabad City