कुत्रे उकरून खातात मृतदेह!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

औरंगाबाद - मोकाट कुत्र्यांचे शहरातील नागरिकांवर हल्ले सुरूच आहेत. त्यात बेगमपुरा स्मशानभूमीत दफन करण्यात आलेले मृतदेह कुत्रे उकरून काढत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावताना खबरदारी घेतली जात नसल्याने हा प्रकार घडत असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते जमीर कादरी यांनी थेट आयुक्तांकडे केली आहे.

औरंगाबाद - मोकाट कुत्र्यांचे शहरातील नागरिकांवर हल्ले सुरूच आहेत. त्यात बेगमपुरा स्मशानभूमीत दफन करण्यात आलेले मृतदेह कुत्रे उकरून काढत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावताना खबरदारी घेतली जात नसल्याने हा प्रकार घडत असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते जमीर कादरी यांनी थेट आयुक्तांकडे केली आहे.

मोकाट कुत्र्यांनी शहरात उच्छाद मांडला आहे. कुत्र्याने चावा घेतलेले आठ ते दहाजण रोज घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात. दोन आठवड्यांपूर्वी एका बालकाचा बळी कुत्र्यांनी घेतला. महापालिकेने २५ हजारांची मदत जाहीर करून मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला असला तरी कुत्र्यांचा त्रास कमी होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यात आता बेगमुरा स्मशानभूमीत कुत्रे मृतदेह उकरून काढत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विरोधी पक्षनेते जमीर कादरी यांनी सांगितले की, घाटी रुग्णालयातील बेवारस मृतदेह, मृत अर्भक बेगमपुरा स्मशानभूमीत दफन केले जातात. मात्र दफन करताना आवश्‍यक तेवढा खोल खड्डा खोदला जात नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी कुत्र्यांचे टोळके हे मृतदेह उकरून काढून ते खात आहेत. नरभक्षकासारखे बनलेले हे कुत्रे नंतर नागरिकांवर हल्ले करीत आहेत. 

अंत्यसंस्काराची बचतगटावर जबाबदारी   
बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी एका बचतगटाला देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याच बचतगटामार्फत काम केले जाते.

महिन्यात पाच ते सात अंत्यसंस्कार 
अनेकवेळा तपासाच्या कामासाठी पोलिसांना मृतदेह पुन्हा काढावे लागतात. त्यामुळे दफन करताना खोल खड्डे खोदले जात नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी कुत्रे मृतदेह उकरून काढतात. महिन्याला पाच ते सात बेवारस नागरिकांवर अंत्यसंस्कार या ठिकाणी होतात तर मृतदेह उकरून काढण्याचे प्रकार वर्षभरात दोन-तीन घडतात, ते अर्भकच असतात, असे या भागातील नागरिकांनी सांगितले. 

बेगमपुरा स्मशानभूमीत कुत्रे मृतदेह उकरून खात असल्याच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी चकरा मारत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येत असल्यामुळे कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. 
- जमीर कादरी, विरोधी पक्षनेते.

Web Title: Dogs eat dead bodies in Begampura crematorium

टॅग्स