'ती' पाच एकर जागा कॉंग्रेसला दान करा : खासदार इम्तियाज जलील 

प्रकाश बनकर
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

"आम्ही पाच एकर जागेसाठी लढलो नाही. आमची लढाई न्यायासाठी होती, खैरातीसाठी नव्हती. कॉंग्रेसने कुलुप उघडले नसते, तर आज हा दिवस आला नसता. त्यामुळे मुस्लिम पर्सनल बोर्डाने "ती' पाच एकर जागा कॉंग्रेसलाच दान करावी. त्यांना "कॉंग्रेस भवन' बांधायला कामी येईल.''

औरंगाबाद : "आम्ही पाच एकर जागेसाठी लढलो नाही. आमची लढाई न्यायासाठी होती, खैरातीसाठी नव्हती. कॉंग्रेसने कुलुप उघडले नसते, तर आज हा दिवस आला नसता. त्यामुळे मुस्लिम पर्सनल बोर्डाने "ती' पाच एकर जागा कॉंग्रेसलाच दान करावी. त्यांना "कॉंग्रेस भवन' बांधायला कामी येईल,'' असा टोला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला. 

Image result for imtiaz jaleel

सर्वोच्च न्यायालयाने आज अयोध्या प्रकरणाचा निकाल जाहीर केल्यानंतर मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीनचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. पाच एकर जागेची खैरात आम्हाला नको, असे ते म्हणाले. त्यानंतर काही वेळातच मजलिसचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेतली.

Image result for imtiaz jaleel

लागेल तेवढा निधी आणीन ः इम्तियाज जलील

ते म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाचा आम्ही आदर करतो. मात्र आम्हाला या विषयावर नाराजी व्यक्‍त करण्याचा अधिकार आहे. आमची न्यायालयीन लढाई ही न्यायासाठी होती. पाच एकर जागेच्या खैरातीसाठी नव्हती. भारतीय मुस्लिमांची इतकी ऐपत आहे की, ते एकटे जागा घेऊन मस्जिद बांधू शकतात.'' 

कॉंग्रेसमुळेच उजाडला आजचा दिवस 

पुढं ते म्हणाले, "ज्या दिवशी बाबरी पडली, त्या दिवसापासून देशात हिंद-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू झाले आणि त्याच मुद्यावर भारतीय जनता पार्टी सत्तेत आली. या प्रकारास जेवढे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार आहेत, तेवढीच कॉंग्रेसही जबाबदार आहे. कॉंग्रेसच्या तत्कालीन सरकारने मशिदीचे कुलुप उघडले नसते, तर आजचा दिवस उजाडला नसता. ही देशाला हिंदुराष्ट्र बनविण्याच्या हालचालीची सुरुवात आहे.'' 

बोर्डाला करणार विनंती 

"फेरविचार याचिकेबाबात मुस्लिम पनर्सल लॉ बोर्ड जी भूमिका घेईल, ती आम्हाला मान्य असणार आहे. यासह ती पाच एकर जागाही कॉंग्रेसला दान देऊ; जेणेकरून तिथे "कॉंग्रेस भवन' बांधता येईल. बोर्डाला याविषयी विनंती करून ही जागा कॉंग्रेसला देण्यास सांगू,'' अशा शब्दांत त्यांनी आपला राग व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donate 5 acre land to Congress : Aurangabad MIM Leader