टंचाईग्रस्त लातूरात पाहा कसे झाले गणेश विसर्जन...

विकास गाढवे
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

दुष्काळामुळे निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गणेशमुर्तीचे विसर्जन न करता त्या दान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला लातूरकरांनी उंदड प्रतिसाद देत गणेशमुर्तीचे विसर्जन न करता दान केले.

लातूर : दुष्काळामुळे निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गणेशमुर्तीचे विसर्जन न करता त्या दान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला लातूरकरांनी उंदड प्रतिसाद देत गणेशमुर्तीचे विसर्जन न करता दान केले. वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा, संस्कृती व संकेत बाजूला ठेऊन लातूरकरांनी पर्यावरणाच्या रक्षणाची नवीन संस्कृती निर्माण केली. यातूनच जलसंवर्धनाचे मोठे काम केले. यामुळे मला परमोच्च आनंद झाला असून तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी (ता. १३) पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

लातूरकरांचे त्रिवार अभिनंदन करून श्रीकांत म्हणाले, ``पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता लातूर शहरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने गणेशमुर्ती दान करण्याचे तसेच घरीच विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. आवाहनाला लातूरकरांनी भव्य प्रतिसाद दिला. तब्बल 28 हजार 775 मुर्तींचे दान केले. या दानशूरांना प्रशासनाकडून प्रशस्तीपत्र देण्यात आले. घरीच विसर्जन करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. मोठ्या संख्येने गणेश मंडळे तसेच नागरिकांनी मुर्तीचा पुढच्या वर्षी पुन्हा वापर करण्याचे नियोजन केले आहे.

इतिहासात पहिल्यांदाच असा सकारात्मक प्रतिसाद पाहयला मिळाला. दान केलेल्या मुर्तीपैकी शाडूच्या मुर्ती नांदेडला पाठवण्याचा विचार आहे. तर मोठ्या संख्येने मुर्तींचा पुन्हा वापर करण्याचे नियोजन आहे. यासाठी काही मुर्तींकारही पुढे आले आहेत. लातूरकरांचा हा सामुदायिक निर्णय समाजाला दिशा देणारा ठरला असून पर्यावरणाच्या रक्षणाची मोठी जबाबदारी पार पाडली आहे.`` उपक्रमासाठी प्रभावी जनजागृती करताना पर्याय ठेवला नाही. गणेशमुर्तीच्या विसर्जनामुळे होणारे दुष्परिणामही यानिमित्ताने निदर्शनास आणून देता आले. पूर्वी पिण्याचे पाणी देणाऱ्या विसर्जन विहिरींची परिस्थिती निरूपयोगी झाली होती. या विहिरी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केल्या. या विहिरींच्या फेरबांधणी व खोलीकरणाचेही काम हाती घेण्यात आले आहे. या विहिरींत आता पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. आपल्या संस्कृतीत जलपूजनाला मोठे महत्व असून पाण्याची नासाडी तसेच ते खराब करण्याचा सल्ला कोणतीही संस्कृती सांगत नाही. यामुळे गणेशमुर्ती विसर्जनातून संस्कृतीची जपणूकच झाल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. 
 

असेन मी.. नसेन मी..       
गणेशमुर्ती दानातून लातूरकरांची वेगळी छबी समोर आली आहे. लातूरकर पर्यावरणप्रेमी व जलसंवर्धक असल्याची जाणीव सर्वांना झाली आहे. पुढच्या गणेशोत्सवात मी जिल्ह्यात कार्यरत असेन किंवा नसेन. लातूरकरांनी ही परंपरा अखंड चालू ठेवावी, असे आवाहन श्रीकांत यांनी केले. जुलैमध्येच टॅंकरने पाणी पुरवठा सुरू झाला असता. मात्र, उपलब्ध पाणी काटसरीने वापरले. सप्टेंबर महिना सुरू होऊनही अजून लातूरला टॅंकर सुरू झाले नाही. टंचाईच्या काळात पदोपदी पाण्याचा अपव्यय टाळला. यामुळे लातूरकरांना पाणी देण्यासाठी कोणीही विरोधी भूमिका घेणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donate ganesh statues pattern appreciated district collecter in latur