पावसाअभावी मासेमारी व्यवसाय आला धोक्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

अहमदपूर(जि. लातूर) तालुक्‍यातील काही साठवण आणि लघू पाझर तलाव कोरडे आहेत, तर बरेच तलाव मृतसाठ्यात असून पाणीसाठा नसल्याने तालुक्‍यातील मासेमारी व्यवसाय धोक्‍यात आला आहे. 

अहमदपूर(जि.लातूर) ः तालुक्‍यातील काही साठवण आणि लघू पाझर तलाव कोरडे आहेत, तर बरेच तलाव मृतसाठ्यात असून पाणीसाठा नसल्याने तालुक्‍यातील मासेमारी व्यवसाय धोक्‍यात आला आहे. 

तालुक्‍यात कोपरा, पाटोदा, काळेगाव, अहमदपूर, कौडगाव, सावरगाव थोट, तांबटसांगवी, मावलगाव, खंडाळी, हगदळ गुगदळ, नागझरी, अंधोरी, ढाळेगाव, येस्तार, मोळवण, कावळवाडी, हंगेवाडी, यलदरी असे अठरा साठवण तलाव तर भुतेकरवाडी, नागठाणा, उगिलेवाडी, गोताळा, वाकी, तेलगाव, मोघा, थोडगा, सोनखेड, धसवाडी असे दहा लघू पाझर तलाव आहेत. यंदा तालुक्‍यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने कोणत्याही तलावात पाणीसाठा झाला नाही. 

भुतेकरवाडी, थोडगा, गोताळा, नांदूर, बोंबल्या होळ या तलावांतील पाण्यावर मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय अवलंबून आहे. यावर दीडशे कुटुंबांतील आठशेपेक्षा अधिक लोकांचा उदरनिर्वाह चालतो. मागील तीन-चार वर्षांतील अवर्षणाने मासेमारी व्यवसायाला फटका बसला आहे. यंदा तर पाण्याअभावी मत्स्यबीजही टाकता आले नाही. मासेमारी व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर असल्याने मासेमारांना नवीन कामाचा शोध घ्यावा लागत आहे. 

गेल्या चाळीस वर्षांत पहिल्यांदाच अशी अवस्था झाली आहे. मत्स्यबीज टाकण्यासाठी लागणारा पाणीसाठा नसल्याने बीज टाकलेच नसून, पुढील काळात व्यवसाय बंदच राहणार असल्याने एका हॉटेलात काम करत आहे. पहिल्यांदाच व्यवसाय बदलायची वेळ आली आहे 

 बालाजी डुकरे, मासेमार, अहमदपूर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: down fall in fishing