...हा तर उपेक्षितांवरील लिखाणाचा गौरव - लोमटे

...हा तर उपेक्षितांवरील लिखाणाचा गौरव - लोमटे

परभणी - देश महासत्तेच्या दिशेने जात आहे. झगमगत्या दुनियेत शेवटचा वंचित माणूस कमालीचा दबलेला व अस्वस्थ आहे. अशा उपेक्षितांच्या जगण्यातील ताणतणाव, आशा-आकांक्षा टिपण्याचा प्रयत्न साहित्यातून केला आहे. साहित्य अकादमी पुरस्काराने उपेक्षितांवरील लिखाणाचा गौरव झाला आहे. या पुरस्कारामुळे समाधानी असल्याची प्रतिक्रिया डॉ. आसाराम लोमटे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

लोमटे यांच्या "आलोक' या कथासंग्रहासाठी यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. ते म्हणाले, "1996 पासून कथालेखनाला सुरवात केली. महाविद्यालयीन जीवनात 2006 मध्ये माझे पहिले पुस्तक आले. पूर्वी लघुकथा हा प्रकार दुय्यम मानला जात होता. आता तो गंभीर आणि सशक्त साहित्य प्रकारामध्ये गणला जात आहे. आजची मराठी कथा ही निश्‍चितपणे गंभीर स्वरूपाच्या वळणावर आहे. "आलोक' कथासंग्रह बहुस्तरीय आहे. लिखाणातून शोषण व्यवस्थेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आहे. आपण जे गांभीर्याने लिहितो, त्याची नोंद घेतली जाते, ही नक्कीच सुखावणारी घटना असते. लेखक आपल्या कथांमधून जगणं मांडत असतो. त्यामुळे अशा पुरस्कारामुळे लेखकाच्या जगण्याचा सन्मान होतो.''

साहित्य वाटचाल...
डॉ. लोमटे यांची "इडा पिडा टळो' आणि "आलोक' ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. "बदलते ग्रामीण वास्तव आणि मराठी कादंबरी' या विषयावर त्यांनी नुकतीच "पीएच.डी.' मिळविली आहे. त्यांच्या कथांचे हिंदी, कन्नड भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. पाच दीर्घ कथांचा कन्नड भाषेतील "कोटेमने' या नावाने संग्रह प्रकाशित झाला आहे. विशेष म्हणजे "इडा पिडा टळो'मधील "बेइमान' या कथेवर "सरपंच भगीरथ' या मराठी चित्रपटाची निर्मिती झाली आहे. "इडा पिडा टळो' या कथासंग्रहावर एम.फिल.चे आठ प्रबंध झाले आहेत. "आलोक'कथासंग्रहावर काही विद्यार्थ्यांकडून "एम.फिल.'साठी संशोधनही झाले आहे. याशिवाय सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ, कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आदी विद्यापीठांत त्यांच्या कथांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

मिळालेले पुरस्कार
पत्रकारिता क्षेत्रातील कार्याबद्दल लोमटे यांना समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पारितोषिक, दर्पण पुरस्कार, कृषिपूरक पत्रकारितेसाठी शासनाचा शेतीमित्र पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथगौरव पुरस्कार, भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार, शासनाचा राज्य पुरस्कार, पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार, सह्याद्री वाहिनीच्या नवरत्न पुरस्कारातील "साहित्यरत्न' पुरस्कार, पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ग. ल. ठोकळ पारितोषिक, नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे डॉ. अ. वा. वर्टी पुरस्कार, भि. ग. रोहमारे पुरस्कार, शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानचा शेतकरी साहित्य पुरस्कार, वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेचा पुरस्कार, सांगलीतील लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाङ्‌मय पुरस्कार, नांदेडचा प्रसाद बन ग्रंथगौरव पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com