महापरिनिर्वाण दिन विशेष : बाबासाहेबांनी धुडकावली होती दिलीपकुमारांची देणगी

संकेत कुलकर्णी
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

अनंत अडचणी सोसून बाबासाहेबांनी हे कॉलेज उभे केले. ते अनेकदा औरंगाबादेत येत, तेव्हा रेल्वे हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असे. प्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांनी याच ठिकाणी तेव्हा बाबासाहेबांना मिलिंद कॉलेजच्या उभारणीसाठी भरघोस देणगी देऊ केली होती; पण त्यात प्रवेशद्वाराला आपले नाव देण्याची अट घातली. बाबासाहेबांनी ती देणगी धुडकावली. 
 

अजिंठा-वेरूळच्या सान्निध्यात वसलेल्या औरंगाबादवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फार प्रेम होते. या शहरात ते 1933-34 पासून येत होते. मराठवाड्याच्या मागासलेपणाची कारणे केवळ आर्थिकच नसतात, तर शिक्षणाचा अभाव हेही त्याचे मुख्य कारण असल्याचे त्यांना वाटे. 30 डिसेंबर 1938 ला मक्रणपूर परिषदेत बाबासाहेबांनी मराठवाड्यात हैदराबाद संस्थानतर्फे अस्पृश्‍यांसाठी शाळा काढण्यात न आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. येथील दलितांना शिक्षणाची गरज असल्याचे त्यांनी ओळखले होते. इथेच एका संकल्पाची पेरणी झाली होती. त्यानंतर 12 वर्षांनी घडलेली ही गोष्ट... 

19 जून 1950 ला बाबासाहेबांनी औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालय सुरू केले. सुरवातीला छावणी परिसरातील चार बंगल्यांत हे कॉलेज सुरू झाले. प्राचार्य म. भि. चिटणीस, कमलाकांत चित्रे, रुंजाजीमामा भारसाखळे यांनी कॉलेजसाठी अहोरात्र कष्ट उपसले. बाबासाहेबांचे या सर्वांवर जातीने लक्ष होते. 1950 च्या जुलै महिन्यापासून बाबासाहेब आपल्या कॉलेजच्या उभारणीच्या ओढीने वारंवार औरंगाबादला येऊ लागले. छावणीतील जागा अस्थायी होती. महाविद्यालय काढायचे असेल, तर स्वतःची इमारत हवी. हैदराबाद राज्यातील अस्पृश्‍यांच्या शैक्षणिक विकासासाठी निजाम सरकारने एक कोटी रुपयांचा शेड्युल्ड कास्ट ट्रस्ट फंड उभारला होता. या फंडातून बाबासाहेबांनी 12 लाख रुपये बिनव्याजी कर्ज घेतले. 155 एकर जागा खरेदी केली. 
मिलिंद महाविद्यालयाची उभारणी सुरू झाली. या सर्व परिसराला पुढे बाबासाहेबांनी "नागसेनवन' नाव दिले. 

 

Image may contain: one or more people, people standing, wedding and outdoor
मिलिंद महाविद्यालयाच्या कोनशिला अनावरणप्रसंगी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 

1 सप्टेंबर 1951 ला भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते कोनशिला बसविण्यात आली. इतर प्रांतांच्या तुलनेत हैदराबाद प्रांत शिक्षणात मागे आहे. येथे शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या इतरांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळेच आपण येथे महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले. याप्रसंगी मुख्यमंत्री एम. के. वेलोडी, माजी शिक्षणमंत्री राजा धोंडीराम बहादूर, अर्थमंत्री सी.व्ही.एस. राव, महसूलमंत्री शेषाद्री, शिक्षणमंत्री रामकृष्णराव, वनमंत्री गोपालाचारी अय्यंगार, उस्मानिया विद्यापीठाचे कुलगुरू आबासे, औरंगाबादचे जिल्हाधिकारी राजवाडे, हैदराबाद स्टेट कॉंग्रेसचे अध्यक्ष दिगंबरराव बिंदू या सर्वांचे बाबासाहेबांनी अगदी आवर्जून आभार मानले. 
अनंत अडचणी सोसून बाबासाहेबांनी हे कॉलेज उभे केले. ते अनेकदा औरंगाबादेत येत, तेव्हा रेल्वे हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असे.

संबंधित बातमी : आंबेडकरांनी गांधीजींना लिहिलेल्या पत्राचे कुतूहल

Image may contain: 1 person, sitting, standing and outdoor

प्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांनी याच ठिकाणी तेव्हा बाबासाहेबांना मिलिंद कॉलेजच्या उभारणीसाठी भरघोस देणगी देऊ केली होती; पण त्यात प्रवेशद्वाराला आपले नाव देण्याची अट घातली. बाबासाहेबांनी ती देणगी धुडकावली. ते म्हणाले, "ज्या लोकांनी आपल्या शील, चारित्र्याचे प्रदर्शन मांडून धनदौलत कमावली आहे, अशा लोकांकडून मी कधीच पैशांची अपेक्षा केली नाही आणि करणारही नाही. ज्यांनी अनीतीच्या आणि भ्रष्ट मार्गाने धनदौलत जमवली आहे, त्यांच्या मदतीच्या बळावर ज्ञानदानासारखे पवित्र कार्य मी कधीही करणार नाही, मग माझ्या संस्था मेल्या तरी बेहत्तर!'' 
मिलिंदच्या इमारतीचा नकाशा बाबासाहेबांनी स्वतः लक्ष घालून बनविला. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने वसतिगृह, करमणूक हॉल, डायनिंग हॉल, किचन रूम, स्टोअर रूम अशा प्रकारच्या सोयींचा समावेश करून त्यांनी आराखडा तयार केला. ग्रंथालय, प्रयोगशाळा, प्राध्यापकांच्या खोल्या, मुलींच्या खोल्या, स्वच्छतागृहे, सभागृह असं सगळं उभं केलं. कॉलेज उभं राहिलं.

हेही वाचा : प्रबोधनकार ते आदित्य, ठाकरे कुटुंबातील चौथी पिढी काय करते? वाचा.... 

Image may contain: one or more people and people standing

मराठवाडा, विदर्भातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येथे आले. शिकले, मोठे झाले.  बाबासाहेबांचे अतिशय विश्‍वासू प्राचार्य म. भि. चिटणीस, डॉ. म. ना. वानखेडे, प्रा. रा. ग. जाधव, प्रा. मे. पुं. रेगे, डी. जी. जाधव, प्राचार्य एम. एल. शहारे, डॉ. रे. प. नाथ, भालचंद्र फडके, प्रा. त्र्यंबक महाजन, बी. एच. वराळे, डॉ. गंगाधर पानतावणे यांसारख्या अनेक धुरंधरांनी नागसेनवनाचे शैक्षणिक नेतृत्व केले. 
 
नागसेनवनाची सद्यःस्थिती 
छावणी परिसर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मधोमध वसलेल्या नागसेनवनात आजघडीला मिलिंद कला, विज्ञान महाविद्यालय, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन, मल्टिपर्पज स्कूल अशा अनेक संस्थांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. मध्यवर्ती बसस्थानकापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हा परिसर आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Ambedkar Refused Dilipkumar's Donation