डॉ. अनुपम टाकळकर यांना सुरक्षा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - शहरातील टाकळकर स्कीन केअर हॉस्पिटलचे डॉ. अनुपम टाकळकर यांच्यावर हॉस्पिटलमध्ये भरदिवसा पिस्तूल रोखून 25 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार गुरुवारी (ता. दोन) दुपारी घडला. यानंतर त्यांना पोलिसांनी संरक्षण दिले असून, हॉस्पिटलच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

औरंगाबाद - शहरातील टाकळकर स्कीन केअर हॉस्पिटलचे डॉ. अनुपम टाकळकर यांच्यावर हॉस्पिटलमध्ये भरदिवसा पिस्तूल रोखून 25 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार गुरुवारी (ता. दोन) दुपारी घडला. यानंतर त्यांना पोलिसांनी संरक्षण दिले असून, हॉस्पिटलच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

डॉ. टाकळकर त्यांच्या जालना रस्त्यावरील हॉस्पिटलमध्ये गुरुवारी प्रॅक्‍टिस करीत होते. दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी एक पंचविशीतील तरुण त्यांच्या दालनात घुसला. "मुक्तारभाईने मुझे भेजा है, बहुत पैसे छाप रहा है,' असे सांगत त्याने टाकळकर यांना धमकावयाला सुरवात केली. त्यानंतर त्याने खंडणीपोटी पंचवीस लाख रुपये टाकळकरांना मागितले. त्या वेळी डॉ. टाकळकर भेदरले. याच अवस्थेत त्यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. त्या वेळी त्याने चक्क पिस्तूल काढून डॉ. टाकळकरांवर रोखले व "पैशांची व्यवस्था करा, परत शुक्रवारी (ता. तीन) याच वेळेत फोन करू,' असे टाकळकरांना धमकावत तो निघून गेला. या प्रकारानंतर टाकळकर यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, जिन्सी पोलिस व पोलिस आयुक्त अमितशेकुमार घटनास्थळी पोचले. त्यांनी माहिती घेऊन लगेचच तपासाला सुरवात केली; पण संशयित तरुणाचे धागेदोरे लागले नाहीत. याप्रकरणी डॉ. टाकळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.

सीसीटीव्ही असूनही रेकॉडिंग नाही
बंदूकधारी तरुण रुग्णालयात प्रवेश करतानाचा प्रकार सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाला. पण, त्यात संशयिताचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. टाकळकरांना धमकावतानाचा प्रकार कॅमेऱ्याद्वारे सीसीटीव्हीत दिसत होता. डॉक्‍टरांच्या पत्नीने हा प्रकार सीसीटीव्हीतून पाहिला; पण तांत्रिकदृष्ट्या सीसीटीव्हीत बिघाड असल्याने छायाचित्रण झाले नाही.

संशयिताचे रेखाचित्र
धमकावणाऱ्या तरुणाचे टाकळकरांनी पोलिसांना वर्णन सांगितले. त्यानुसार संशयितांचे रेखाचित्र काढण्यात आले असून, ते लवकरच जारी केले जाईल तसेच त्यांना सुरक्षा पुरवल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.

यापूर्वीही धमकीचा संदेश
अनुपम टाकळकरांना सहा महिन्यांपूर्वी अज्ञात व्यक्तीने एसएमएस करून खंडणी मागितली होती. त्यावेळी त्यांनी ही बाब पोलिस आयुक्तांना सांगितली. पोलिसांनी तपास केला असता, उत्तर प्रदेशातून हा संदेश आल्याचे त्यावेळी उघड झाले होते. पण, त्यानंतर कोणताही त्रास त्यांना झाला नव्हता.

Web Title: DR. Anupam takalakar security