‘डौलानं फडकतो जेव्हा झेंडा तो निळा...’

‘डौलानं फडकतो जेव्हा झेंडा तो निळा...’

बीड - सर्वत्र निळ्या झेंड्यांचा डौल आणि निळीची उधळण, ‘जय भीम’, ‘एकच साहेब, बाबासाहेब’ असा सर्वत्र जयघोष, डीजेच्या तालावर तरुणाईचा जल्लोष आणि उत्साहात शनिवारी (ता. १४) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बीडमध्ये साजरी झाली. जिल्हाभरातही जयंतीचा मोठा उत्साह होता.

सार्वजनिक समित्यांसह विविध कार्यालयांतही डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. मिरवणुकांमध्ये ‘कसा शोभला असता भीम नोटावर, टाय अन्‌ कोटावर’, ‘डौलानं फडकतो जेव्हा झेंडा तो निळा, तव्हा उडतो धुरूळा’ यांसह विविध भीमगीतांनी मिरवणुकांत जोश आणला. बीडमध्ये २५ च्यावर मिरवणुका निघाल्या. 

डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मागील दहा दिवसांपासून शहरात विविध सामाजिक उपक्रम सुरू आहेत. शनिवारी दिवसभर उत्साह होता. सकाळी आठला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेली फेरी जालना रोड, सुभाष रोड, माळीवेसमार्गे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोचली. फेरीत पांढरे वस्त्र परिधान करून अनुयायी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले. सदाशिव कांबळे यांनी उपस्थितांना त्रिशरण, पंचशील आणि भीमस्तुती ग्रहण करून दिली. यानंतर भीम अनुयायांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पंचशील ध्वजवंदन पार पडले. अधिकाऱ्यांसह विविध राजकीय पक्ष-संघटनांच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी जयंतीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, सायंकाळी साडेसहानंतर मिरवणुकांना सुरवात झाली. आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांनी सजविलेल्या रथात डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा शोभून दिसत होती. मुख्य मिरवणुकीमागे विविध भागांतील उत्सव समित्यांच्या मिरवणुकाही निघाल्या. सर्व चौकांमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. आवश्‍यक तेथे बॅरिकेट्‌स लावून एकेरी मार्ग सुरू ठेवत मिरवणुकांना रस्ता मोकळा करून देण्यात येत होता. महिला पोलिस कर्मचारी व स्वयंसेवक महिला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी तैनात होते. सहाशे होमगार्डही कर्तव्यावर होते. दरम्यान, शहरात परंपरेनुसार शुक्रवारी (ता. १३) मध्यरात्री समताज्योत काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मशाल पेटवून ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत नेण्यात आली. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करण्यात आली.

पाटोद्यात अभिवादन
पाटोदा (बातमीदार) : शहरातील नागरिकांनी डॉ. आंबेडकर चौकात प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्त, पोलिस, डॉक्‍टर, वकील, प्राध्यापक उपस्थित होते. शहरातून भव्य दुचाकी फेरी काढण्यात आली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन
अंबाजोगाई (बातमीदार) ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शनिवारी जयंतीनिमित्त पथसंचलन करून अभिवादन करण्यात आले.

येथील शंकर महाराज वंजारी वसतिगृहापासून पथसंचलनास प्रारंभ झाला. डॉ. आंबेडकर चौकात संचलन पोचल्यावर चौकातील स्मृतिस्थळाला स्थानिक संघचालक दत्तप्रसाद रांदड यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. शहर कार्यवाह वशिष्ठ भोसले, पूर्व संघचालक विजयराव वालवडकर, जिल्हा प्रचारक संतोष कदम, समरसता आणि सद्‌भावप्रमुख माधवराव गायकवाड, बिपीन क्षीरसागर, ॲड. मकरंद पत्की, शंतनू हिरळकर, रंगनाथ काटकर, वामनराव ईटकूरकर, परमेश्वर सोनवणे, नयन वाघचौरे, सोमनाथ कलशेट्टी, अनंत काळदाते, ओंकार पांचाळ, प्रकाश जोशी, डॉ. निशिकांत पाचेगावकर यांच्यासह स्वयंसेवक उपस्थित होते. नयन वाघचौरे यांच्या गीताने सांगता झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com