एनआयआरएफ रँकिंगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 85 वे

अतुल पाटील 
सोमवार, 8 एप्रिल 2019

नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 85व्या स्थानी मजल मारली आहे. गेल्यावेळी पेक्षा 22 गुणांनी झेप घेतली आहे.

औरंगाबाद : नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 85व्या स्थानी मजल मारली आहे. गेल्यावेळी पेक्षा 22 गुणांनी झेप घेतली आहे. दहा दिवसांपूर्वी झालेल्या नॅक मुल्यांकनात विद्यापीठाने गुणांमध्ये सुधारणा करत 'अ' दर्जा कायम ठेवला आहे. 

केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत एनआयआरएफ काम करते. एनआयआयएफ हे संशोधन, पेटंट, आयपीआर, इनोव्हेशन, स्कील डेव्हलपमेंट, उद्योजकता विकास या बाबी तपासून हे मानांकन मिळाले आहे. गेल्यावेळी हा क्रमांक 107 वर होता. त्यात सुधारणा होऊन 85 पर्यंत झेप घेतली आहे. देशभरात 930 विद्यापीठ असून राज्यात 16 विद्यापीठ आहेत. त्यात पुणे विद्यापीठ 10 व्या तर मुंबई विद्यापीठ 81 स्थानावर आणि औरंगाबादचे विद्यापीठ 85 स्थानावर आहे, ही बाब अभिमानाची असल्याचे कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांनी 'सकाळ'ला सांगितले. डॉ. चोपडे यांच्या नेतृत्वात नॅकनंतर हे दुसरे यशही दमदार असल्याने विद्यापीठात कौतुकाचा विषय ठरत आहे. 

एनआयआरएफच्या यादीत राज्यातील इतर संस्थांमधील मुंबईचे आयसीटी 15व्या स्थानी, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्युट 17व्या, टीस 35व्या, पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ 46व्या, सिम्बॉयसिस 56व्या, मुंबईची एसव्हीकेएम संस्था 57व्या, भारती विद्यापीठ 62व्या, मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील संस्था 88 व्या स्थान आहे. यादीतील अंतिम शंभरमध्ये विद्यापीठाने स्थान पटकावले आहे. 

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना सोबत घेऊन ही प्रगती करणे, आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. कदाचित ग्रामीण विद्यापीठात आपण पहिलेच असू शकतो. पुढील वर्षी मानांकनात 50 पर्यंत झेप घेऊ. नॅक आणि एनआयआरएफमध्ये घेतलेली झेप माझ्यासाठी समाधान देऊन जाते. 
- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद 

Web Title: Dr Babasaheb Ambedkar Marathwada University 85th In the NIRF ranking