देशाला 'या' लोकांपासून वाचवा : डॉ. कांचा इलैया

सुशांत सांगवे
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

"बीजेपी 10-15 वर्षे सत्तेत राहिली तर पाकिस्तान भारताला बळकावू शकते. चीनसाठी तर हे खूप सोपे होऊन जाईल. 'बीजेपी'वाले लेखकांना लिहू देत नाहीत. त्यांची पुस्तके हटवत आहेत. स्वतःही ते लिहीत नाहीत. उलट खरी संस्कृती पुसत आहेत." 
- डॉ. कांचा इलैया

लातूर : "शूद्र, दलितांबरोबरच सर्व जातीतील लोकांनी आम्हा ब्राह्मणांच्या पायाजवळ येऊन बसावे, आम्ही सांगू तेच त्यांनी शिकावे, असे हिंदू राष्ट्र भारतीय जनता पक्षाला आणायचे आहे. त्यामुळे सावध रहा. ते आणखी सत्तेत राहिले तर देशाचे हाल होतील. मागासवर्गीयांची तर अक्षरशः वाट लागेल. त्यामुळे देशाला 'त्या' लोकांपासून वाचवायला हवे", असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. कांचा इलैया यांनी व्यक्त केले. या बदलासाठी आम्ही चळवळ सुरू केली आहे, तुम्हीही करा, असे आवाहनही त्यांनी केले.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन आणि महाराष्ट्र विकास आघाडी यांच्या वतीने आयोजित ओबीसी काल, आज आणि उद्या या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, आघाडीचे अध्यक्ष अण्णाराव पाटील, बसवंत उबाळे, सुभाष माने, प्रा. अंकुश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. इलैया म्हणाले, दिल्लीत बनिया, ब्राह्मण, कायस्थ, खत्री हे चार वर्गातील मुले अनेक वर्षांपासून इंग्रजीत शिकत आहेत. तेच दिल्ली चालवत आहेत. मात्र, आमची मुले तेलगू भाषेत, तुमची मराठी माध्यमात शिकतात आणि शेवटी इथेच बसतात. पण त्यांची मुले इंग्रजी माध्यमात शिकत आहेत. त्यामुळे मोठमोठ्या पदांवर पूर्वीही तेच होते, आजही तेच आहेत. हे चित्र बदलायला हवे. आपणही आपल्या मुलांना सरकारच्या इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये घालायला हवे. सरकारने प्रादेशिक भाषांइतकाच समांतर दर्जा इंग्रजी भाषेतील शिक्षणाला द्यावा, यासाठी आम्ही दिल्लीपासून प्रयत्न सुरु केले आहेत." ब्राह्मणांना गुरु मानू नका. ज्यांना शेतीत राबता येत नाही, जनावरे सांभाळता येत नाही, ज्यांना श्रम माहितीच नाहीत ते गुरु कसे होतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मरणे सेलिब्रेट कसे करता ?
रामाने रावणाला मारले, हे सर्वांना माहिती आहे. तरी रावणाचा मृत्यू आपण दरवर्षी सेलिब्रेट करतो. त्याला जाळतो. एखाद्याचे मरणे आपण कसे काय सेलिब्रेट करतो? अशी संस्कृती कोठेही पाहायला मिळत नाही. जीजस, गौतम बुद्ध यांचा जन्म दिवस साजरा होतो. कारण त्यांनी प्रेम, समानतेचा संदेश दिला, असे इलैया यांनी सांगितले.

"बीजेपी 10-15 वर्षे सत्तेत राहिली तर पाकिस्तान भारताला बळकावू शकते. चीनसाठी तर हे खूप सोपे होऊन जाईल. 'बीजेपी'वाले लेखकांना लिहू देत नाहीत. त्यांची पुस्तके हटवत आहेत. स्वतःही ते लिहीत नाहीत. उलट खरी संस्कृती पुसत आहेत." 
- डॉ. कांचा इलैया

Web Title: Dr kancha ilaiah criticize BJP politics and indias situation