अंदुरेने वीस दिवसांपूर्वी सुरळेकडे सोपविले पिस्तूल 

अंदुरेने वीस दिवसांपूर्वी सुरळेकडे सोपविले पिस्तूल 

औरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित सचिन अंदुरे याने वीस दिवसांपूर्वी त्याचा मेहुणा शुभम सूर्यकांत सुरळे (रा. दत्त मंदिर, औरंगपुरा) याच्याकडे पिस्तुल सुरक्षित ठेवण्यासाठी दिले होते. ही बाब सीबीआयने सिटी चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. शुभमची चौकशी केल्यानंतर पिस्तूल "सीबीआय'च्या हाती लागले आहे. 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात गुरुवारी (ता.16) सचिन अंदुरे याला अटक झाली. त्याला औरंगाबादेतून ताब्यात घेत पुणे येथे नेण्यात आले. त्या वेळी त्याचा मेहुणा शुभम सोबत गेला होता; परंतु दुसऱ्याच दिवशी तो घरी परतला. "सीबीआय'ने सचिनची कसून चौकशी केली. त्या वेळी त्याच्याकडे एक पिस्तूल असल्याची बाब समोर आली. "सीबीआय'चा शुभमवरही संशय होता. त्याच्या औरंगपुरा येथील घरी चौकशी केली त्या वेळी पंधरा ते वीस दिवसांपूर्वी सचिनने शुभमकडे पिस्तूल सुरक्षित लपवून ठेवण्यास दिले होते, अशी माहिती समोर आली. तसेच शुभमने हेच पिस्तूल व काडतुसे रोहित रेगे याच्याकडे सुरक्षित ठेव, असे चुलत भाऊ अजिंक्‍य सुरळे याला सांगितले. त्यानुसार त्याने रोहितकडे पिस्तूल ठेवले होते. 

या बाबींचा होणार उलगडा 
-जप्त पिस्तुलाची निर्मिती कधी? 
-पिस्तूल किती वर्षे जुने आहे? 
-पिस्तुलामधून गोळीबार झाला होता का? 
-हत्येतील गोळ्या व काडतुसांचे साम्य तपासणार 
-जप्त पिस्तुलाचा गोळीबारासाठी सराव झाला का? 

शुक्रवारपर्यंत कोठडी 
शुभम सुरळे, अजिंक्‍य सुरळे व रोहित रेगे यांना औरंगाबादेतील न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील भाग्यश्री संचेती व बालाजी गवळी यांनी हत्यार कोठून आणले, जवळ बाळगण्याचा उद्देश काय होता, आदी सखोल चौकशी करावयाची असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयात केली. ती ग्राह्य धरत सुनावणीअंती प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी संशयितांना शुक्रवारपर्यंत (ता. 24) पोलिस कोठडी सुनावली. 

सहा महिन्यांत लागणार होती नोकरी 
रोहितचे वडील महसूल विभागात नोकरीला होते. अनुकंपा तत्त्वावर त्याला वडिलांच्या जागेवर सहा महिन्यांत नोकरी मिळण्याची संधी होती, अशी माहिती त्याच्या नातेवाइकांकडून देण्यात आली; परंतु घरात पिस्तूल सापडल्याने चालून येणारी नोकरी गमावण्याची वेळ त्याच्यावर आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com