पिस्‍तूल, काडतुसांसह तिघे जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरे याला अटक केल्यानंतर दहशतवादविरोधी पथक (एटीएस), ‘सीबीआय’तर्फे औरंगाबादेत छापासत्र सुरूच असून, देवळाई भागात मंगळवारी (ता. २१) पहाटे तीनच्या सुमारास केलेल्या कारवाईत अंदुरेशी संबंधित तिघांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. त्यात अंदुरेच्या दोन मेहुण्यांसह मित्राचा समावेश आहे. संशयितांच्या औरंगपुरा, धावणी मोहल्ला येथील घरझडतीत देशी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, अन्य काही शस्त्रे सापडली. 

रोहित रेगे, सचिन अंदुरे याचा सख्खा मेहुणा शुभम सुरळे, चुलत मेहुणा अजिंक्‍य सुरळे अशी संशयितांची नावे असल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले.

संशयित सचिन अंदुरे याला अटक झाल्यानंतर सीबीआयने औरंगाबाद शहरावर लक्ष केंद्रित केले. अंदुरेशी संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत असतानाच रोहित व सुरळे बंधूंची नावे पुढे आली. त्यांच्यावर शस्त्र बाळगल्याचा आरोप आहे. त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल, तीन काडतुसे, तलवार, खंजिर आदी शस्त्रे सापडली. यातील पिस्तूल अंदुरेचे असल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले. सीबीआयने ता. १६ ऑगस्टला सचिनला अटक केली, त्या वेळी शुभमही त्याच्यासोबत पुणे येथे गेला होता; परंतु त्यानंतर तो ता. १७ ऑगस्टला औरंगाबादेत परतला. त्यानंतर शस्त्र लपविल्याप्रकरणी त्यालाही एटीएसने आज ताब्यात घेतले. 

दरम्यान, शस्त्रे बाळगल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. त्यांना सीबीआयने अटक केली असून सिटी चौक पोलिस कस्टडीत ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक दादासाहेब शिनगारे यांनी दिली. संशयितांना ताब्यात घेणे, घरझडती, चौकशी अशा वेगवेगळ्या टप्प्यांवरील कारवाई तब्बल पंधरा तास सुरू होती. त्यानंतर रात्री उशिरा गुन्हा, अटकेची प्रक्रिया पार पडली.

सचिनचे पिस्तूल रोहितच्या घरी
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात वापरल्याचा संशय असलेले पिस्तूल सचिनने मेहुणा शुभम व अजिंक्‍य यांच्याकडे दिले होते. त्यांनी हेच शस्त्र धावणी मोहल्ल्यातील रोहितकडे दिले. ते रोहितने स्वत:च्या घरी लपविले होते. ही बाब त्याच्या कुटुंबीयांनाही माहिती होती, असे आजच्या छाप्यानंतर एटीएसच्या सूत्रांनी सांगितले.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण
 अंदुरेच्या दोन मेहुण्यांसह मित्राचा समावेश
 औरंगपुरा, धावणी मोहल्ल्यात घरझडती
 पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत कारवाई

घटनाक्रम...
 सोमवारी मध्यरात्रीनंतर एटीएसचे स्थानिक पथक, सीबीआयचे अधिकारी सातारा ठाण्यात पोचले. 
 संशयितांवरील कारवाईबाबत ठाण्यात रीतसर नोंद.
 मंगळवारी पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटांनी ‘मनजित प्राईड’मध्ये आल्याची रोहित रेगेची सुरक्षारक्षकाच्या वहीत नोंद.
 पाठोपाठ दोन वाजून वीस मिनिटांनी येथेच आल्याची एटीएस अधिकाऱ्यांची नोंद.
 ‘मनजित प्राईड’मधील ए-१ इमारतीत फ्लॅट क्रमांक २०४ मध्ये छापा.
 फ्लॅटमधील भाडेकरूसोबत दोघे ताब्यात, भाडेकरूचा संबंध नसल्याचा ‘एटीएस’चा निर्वाळा.
 फ्लॅटची झडती, दोन वाजून पन्नास मिनिटांनी पथके कारवाई करून परतली. 
 दिवसभर संशयित तिघांची कसून चौकशी.
 रात्री आठपर्यंत एटीएस कार्यालयात बसवून ठेवले.

Web Title: Dr. Narendra Dabholkar Murder Case Three Suspected Arrested Crime