दोन महिन्यांनंतर मिळाले महापालिकेला आयुक्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

औरंगाबाद - तब्बल दोन महिन्यांनंतर महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळाले आहेत. डॉ. विनायक यांनी मंगळवारी (ता. 15) रात्री विमानाने शहरात येत आयुक्तपदाचा पदभार घेतला. 

औरंगाबाद - तब्बल दोन महिन्यांनंतर महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळाले आहेत. डॉ. विनायक यांनी मंगळवारी (ता. 15) रात्री विमानाने शहरात येत आयुक्तपदाचा पदभार घेतला. 

शहरात गेल्या तीन महिन्यांपासून कचराकोंडी निर्माण झाली आहे. तत्कालीन आयुक्त डी. एम. मुगळीकर हे कचराकोंडी फोडण्यात अपयशी ठरल्याने त्यांची शासनाने 15 मार्चला तडकाफडकी बदली केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे आयुक्तांचा प्रभारी पदभार देण्यात आला. श्री. राम यांनी कचराकोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत राज्य सरकारकडून 91 कोटींचा डीपीआर मंजूर करून घेतला. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात कंपोस्टिंग पीट बांधले; मात्र त्यांचीही 12 एप्रिलला पुणे येथे जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून आलेले उदय चौधरी यांच्याकडे प्रभारी आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली. दरम्यान, महापालिका आयुक्तपदी डॉ. निपुण विनायक यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले; मात्र त्यांनी अभ्यास सुटीवर असल्याने पदभार स्वीकारण्यास अवधी मागून घेतला होता. असे असतानाच मंगळवारी सहा वाजता विमानाने ते शहरात दाखल झाले. सायंकाळी साडेसहा वाजता त्यांनी महापालिकेत जाऊन आयुक्तपदाची सूत्रे घेतली. 

पदभार घेताच आंदोलनात मध्यस्थी 
पदभार स्वीकारताच त्यांनी महापालिका मुख्यालयासमोरील पाण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेतली. नागरिकांचे उपोषण सोडवून त्यांना पाणीप्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले. बुधवारी (ता. 16) ते कचराप्रश्‍नी अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत; तसेच पदाधिकाऱ्यांशीही चर्चा करणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. 

बुके नको, अधिकाऱ्यांना सूचना 
आयुक्तपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वीच डॉ. विनायक निपुण यांनी शुभेच्छांचे हार, तुरे, बुके घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: Dr. nipun vinayak new Municipal Commissioner