विद्यापीठाला इनोव्हेशनचे केंद्र बनवू : डॉ. प्रमोद येवले 

अतुल पाटील
सोमवार, 15 जुलै 2019

बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीकडून शिक्षाभूमीकडे येताना मनस्वी आनंद होतोय अशी प्रतिक्रिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाचे नवनियुक्‍त कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी 'सकाळ'ला दिली. 

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळतेय, याचा आनंद सर्वोच्च आहे. हे विद्यापीठ केवळ पदवी देणारे विद्यापीठ न राहता इनोव्हेशनचे प्रमुख केंद्र बनेल, अशी प्रतिक्रिया विद्यापीठाचे नवनियुक्‍त कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी 'सकाळ'ला दिली. 

बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीकडून शिक्षाभूमीकडे येताना मनस्वी आनंद होतोय अशी प्रतिक्रिया देताना डॉ. येवले म्हणाले, "राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी राज्यातील एका जुन्या विद्यापीठाचा कुलगुरू होण्याचा मान दिला. त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. त्यांच्या विश्‍वासाला पुरेपूर उतरेन. या विद्यापीठात शिक्षण घेणारा विद्यार्थी स्पर्धेच्या युगात कणखरपणे उभा राहावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. विद्यापीठातील संशोधनाला प्राधान्य राहील. तसेच प्रशासनाची घडी बसवण्यासाठी काही निर्णय तत्काळ घेण्यात येतील.'' 

"विद्यापीठाचा नावलौकिक वाढविताना हे विद्यापीठ आता केवळ पदवी देणारे केंद्र राहणार नाही तर, याची ओळख इनोव्हेशनचे केंद्र अशी केली जाईल. कौशल्याधिष्ठित आणि रोजगारक्षम विद्यार्थी घडवणे हेच मोठे आवाहन आहे. यासाठी परीक्षा, अभ्यासक्रम यात सुधारणा करून विद्यापीठाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जावर नेण्यात येईल.'' अशी ग्वाही डॉ. येवले यांनी दिली. 
 

मंगळवारी स्वीकारणार पदभार 
राज्यपाल भवनाकडून सोमवारी (ता. 15) नियुक्‍तीचे पत्र मिळाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची सूत्रे मंगळवारी (ता. 16) सकाळी साडे दहा वाजता स्विकारणार आहेत, अशी माहिती डॉ. येवले यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Pramod Yevle's sentiment