औरंगाबाद : घरांत तुंबले ड्रेनेजचे पाणी, अनेकींच्या डोळ्यांत अश्रू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

तोरणागड येथील प्रकार : संतप्त महिलांची महापालिकेत धाव 

औरंगाबाद - सिडको एन-2 भागातील तोरणागडनगरात ड्रेनेज चोकअप झाले असून, नागरिकांच्या घरांत पाणी तुंबत असल्यामुळे सण साजरे करणेही अवघड झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार तक्रारी केल्यानंतरदेखील महापालिका दखल घेत नसल्यामुळे नागरिकांनी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे सोमवारी (ता. नऊ) तक्रार केली. त्यानंतर महापालिकेत धाव घेत संताप व्यक्त केला. 

तोरणागडनगरातील ड्रेनेज चोकअपमुळे नागरिक त्रस्त आहेत. अनेकांनी ड्रेनेजलाइनवर अतिक्रमण करून बांधकाम केल्यामुळे चोकअप काढणेसुद्धा अवघड झाले आहे. नागरिकांनी 20 ऑगस्टला अतिक्रमण विभागाकडे तक्रार केली; मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी आरोग्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्याची प्रत घेऊन सोमवारी महिलांचे शिष्टमंडळ महापालिकेत आले. त्यांनी अतिरिक्त आयुक्त डी. पी. कुलकर्णी यांच्याकडे जाऊन व्यथा मांडली. त्यांनी दखल घेत कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी कल्पना गावंडे, मनीषा पद्मर, चंदा पाटोदी, विद्या पूर्णपात्रे, विजया मोरे, मंगला गांगुर्डे, सुरेखा टापरे, ज्योती खरात, रेखा खरात, सुवर्णा छपरे, अस्मिता येवले, दीपक मोरे यांची उपस्थिती होती. 
 
घर सोडण्याची आली वेळ 
घरात घाण पाणी साचल्यामुळे अनेकांवर घर सोडण्याची वेळ आली आहे. दुर्गंधीतच महिलांनी गौरी-गणपतीचा सण साजरा करावा लागला. काहींना घरे सोडावी लागली. दुर्गंधीमुळे मुले आजारी पडत असल्याने महिलांनी सांगितले. 
 
अनेकींच्या डोळ्यांत अश्रू 
दोन महिन्यांपासून आमच्या व्यथा मांडत आहोत, दखल घेण्यास कोणी तयार नाही, अशा शब्दांत व्यथा मांडताना महिलांच्या डोळ्यांत अश्रू आले. ड्रेनेजचे चोकअप काढण्यासाठी खासगी कामगार आणले असता अतिक्रमणधारक दमदाटी करीत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. 
 
 

या भागात ड्रेनेजलाइनचे चोकअप काढण्यासाठी नागरिकांनी दाबलेले चेंबर मोकळे करणे गरजेचे आहे. त्यासाठी आयुक्तांसह पाहणी करण्यात येईल. स्वतंत्र ड्रेनेजलाइन टाकण्याची नागरिकांची मागणी आहे, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
- मनोज गांगवे, नगरसेवक. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drainage water in homes