पैसे दिले.. अधिकारही दिले तरीही मृत्यूचे सापळे उघडेच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

औरंगाबाद - जयभवानीनगर व सिडको एन-६ येथील नाल्यात पडून दोघांचे बळी गेल्याच्या घटनांना दहा दिवस पूर्ण झाले. मात्र, अद्यापही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. गेल्या आठवड्यात आयुक्तांनी तातडीची कामे करण्यासाठी निधी दिला, वॉर्ड अधिकाऱ्यांना अधिकारही दिले. तरीदेखील प्रशासनाच्या दिरंगाईमुळे मृत्यूचे सापळे सताड उघडे आहेत. 

औरंगाबाद - जयभवानीनगर व सिडको एन-६ येथील नाल्यात पडून दोघांचे बळी गेल्याच्या घटनांना दहा दिवस पूर्ण झाले. मात्र, अद्यापही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. गेल्या आठवड्यात आयुक्तांनी तातडीची कामे करण्यासाठी निधी दिला, वॉर्ड अधिकाऱ्यांना अधिकारही दिले. तरीदेखील प्रशासनाच्या दिरंगाईमुळे मृत्यूचे सापळे सताड उघडे आहेत. 

जयभवानीनगर भागातील नाल्यात पडून २० जूनला भगवान मोरे या कामगाराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चेतन चोपडे या तरुणाचा सिडको एन-सहा भागात बुलेटसह नाल्याच्या पाण्यात पडून बळी गेला. २४ तासांत दोघांचे बळी गेल्यानंतर शहरात खळबळ उडाली. केवळ नाल्यावर संरक्षण जाळी नसल्यामुळे दोघांचे बळी गेले. त्यानंतर महापौरांनी तातडीने शहरातील धोकादायक नाल्यांचा शोध घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते, तर आयुक्तांनी नागरिकांच्या मदतीसाठी पथके स्थापन केली. 

अद्याप या दोन्ही ठिकाणी कामे सुरू झालेली नाहीत. शुक्रवारी (ता. २९) महापौर दालनात नाल्यांचा आढावा घेण्यात आला. या वेळी आयुक्तांनी वॉर्ड अधिकाऱ्यांना एक लाखापर्यंतचा निधी तातडीने खर्च करण्याचे अधिकार दिले, तर प्रत्येक प्रभागाला २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानंतरही कामाला सुरवात झालेली नाही हे विशेष. 

जयभवानीनगर ‘जैसे थे’ 
जयभवानीनगरातील नाल्यात असलेले अतिक्रमणे हटविण्यात आली नाहीत, म्हणून आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी उपायुक्त रवींद्र निकम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. मात्र गेल्या दहा दिवसांत एकाही अतिक्रमणावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी तुंबण्याचा धोका अद्याप कायम आहे.

सिडकोत आयुक्‍ताच्या सहीची प्रतीक्षा
सिडको एन-सहा परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी मातामंदिर येथे नाल्याचे काम करण्याची फाईल अंतिम टप्प्यात होती. एकाचा बळी गेल्यानंतर २५ लाखांच्या या फाईलवर आयुक्तांची सही होईल, अशी अपेक्षा होती. अद्यापही आयुक्तांनी सही केलेली नाही. त्यामुळे सिडकोतही काम सुरू होऊ शकलेले नाही. 

Web Title: dranage issue municipal danger