‘ड्रेसकोड’ कोणाची नकारघंटा 

file photo
file photo

नांदेड : जिल्हा परिषद शिक्षकांच्या ‘ड्रेसकोड’ अंमलबजावणीचे वर्षभरापासून भिजत घोंगडे कायम आहे. गुरुवारी (ता.२०) शिक्षण समितीच्या बैठकीत शिक्षकांच्या ‘ड्रेसकोड’चा मुद्दा चांगलाच तापला. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी आदेश देवूनही ड्रेसकोडची अंमलबजावणी होत नसल्याची खंत सदस्यांनी व्यक्त केली. ‘ड्रेसकोड’ विषयी समितीच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणीच्या सूचना या वेळी देण्यात आल्या.

शिक्षण समितीचे सभापती संजय बेळगे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी शिक्षण समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद सदस्य साहेब धनगे, व्यंकट पाटील गोजेगावकर, बबन बारसे, संध्या धोंडगे, अनुराधा पाटील, ज्योत्स्ना नरवाडे यांच्यासह शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, अधिक्षक श्री. येरपुलवार यांची उपस्थिती होती.
शिक्षणाधिकारी श्री. दिग्रसकर यांनी मागील सभेचा अनुपालन अहवाल सादर केला. मात्र, यामध्ये शिक्षकांच्या ‘ड्रेसकोड’चा मुद्दा समाविष्ठ नसल्याचे खंत व्यक्त करत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

ड्रेसकोड अंमलबजावणीच्या सुचना 
अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी मागील बैठकीत शिक्षकांच्या ड्रेसकोड अंमलबजावणीची सूचना केली होती. शाळा स्तरावरील नादूरुस्त निर्गम उतारे रजिस्टरचे फेर मुल्यांकण करुन त्याचे स्कॅनिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अल्पसंख्याक शाळातील विद्यार्थ्यांची शिक्षण विभागाची धर्मनिहाय यादी सहा महिन्यापासून उपलब्ध होत नसल्याची खंत सभापती श्री. बेळगे यांनी व्यक्त केली. उमरदरी नरसिंह विद्यामंदिर परीक्षा केंद्रावर बारावी बोर्ड परीक्षेच्या इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका व्हाट्सअपवर फिरल्याचा मुद्दा उपस्थित करत साहेबराव धनगे यांनी दोषींवर कठोर करवाईची मागणी माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर यांच्याकडे केली. शाळांना वीज जोडणी व वीज देयकाचा प्रस्ताव शासनकडे पाठवण्याच्या शिफारसीची मागणी श्री. धनगे यांनी केली.

क्रिडाअधिकारी बैठकीला अनुपस्थित 
भोकर येथील जिल्हा परिषद केंद्रिय शाळा नूतन विद्यालयाच्या मुख्यध्यापकांनी २०१७-१८ या वर्षातील लाभाच्या योजने अंतर्गत ४८ हजार व विद्यार्थी गणवेश रक्कम एक लाख रुपये असा एकून एक लाख ४८ हजार रुपये निधी बांधकामासाठी वापरला. या प्रकरणाची इतर विभागातील अधिकाऱ्यांमार्फत चौकशीची श्री. धनगे यांची मागणी मान्य करण्यात आली. गटशिक्षणाधिकरी श्री. मुधोळकर यांच्या चौकशी शिफारस समितीने मांडली. दरम्यान कंधार, नायगाव, बिलोली, धर्माबाद, मुखेड येथील गट शिक्षणाधिकारी बैठकीला अनुपस्थित राहिल्याने संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्याच्या सूचना संध्या धोंडगे यांनी दिल्या. वारंवार सूचना देवूनही क्रिडाधिकारी बैठकीला उपस्थित राहत नसल्याने सभापती यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याची मागणी समिती सदस्यांनी केली.

कॉपीमुक्तीचा निधी खर्च करा
खाजगी अनुदानित शाळेतील ५२ अतिरिक्त शिक्षकांपैकी केवळ बारा शिक्षक समजायोजनाच्या ठिकाणी रुजू झाले आहेत. उर्वरित शिक्षकांनी समायोजनाच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश शिक्षणाधिकारी श्री. दिग्रसकर यांनी दिले. जिल्हा परिषद शाळा परिसरता वृक्षलागवड उपक्रमांतर्गत वृक्षरापेन संगोपनासाठी पाण्याच्या तरतुदीचा प्रस्ताव नियोजन विभागास सादर करण्याची ठराव घेण्यात आला. कॉपीमुक्त दहावी बोर्ड परीक्षेचा निधी वेळेत खर्च करण्याचे आदेशही सभापती श्री. बेळगे यांनी दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com