मद्यपी बुलेटस्वाराची भररस्त्यात  पोलिसांशी हुज्जत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

औरंगाबाद - वाहतूक पोलिसाने दुचाकी अडविल्यावर एका मद्यपी चालकाने भररस्त्यात बुलेट उभी करून ऐन सायंकाळच्या वेळेला वाहतुकीचा खोळंबा केला. पोलिसांनी या ‘भाई’ची बुलेट जप्त करून मद्यप्राशन करून वाहन चालविल्यामुळे त्याला नोटीस बजावली. 

औरंगाबाद - वाहतूक पोलिसाने दुचाकी अडविल्यावर एका मद्यपी चालकाने भररस्त्यात बुलेट उभी करून ऐन सायंकाळच्या वेळेला वाहतुकीचा खोळंबा केला. पोलिसांनी या ‘भाई’ची बुलेट जप्त करून मद्यप्राशन करून वाहन चालविल्यामुळे त्याला नोटीस बजावली. 

सिडकोच्या वसंतराव नाईक चौकामध्ये बुधवारी (ता. १३) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मुकुंदवाडीकडून आकाशवाणी चौकाच्या दिशेने निघालेल्या बुलेटस्वाराला वाहतूक पोलिसांनी अडविले. पोलिसांनी अडवताच या बुलेटस्वाराने भररस्त्यात बुलेट उभी केली. त्यामुळे सायंकाळच्या ट्रॅफिकला अडचण निर्माण झाली. पोलिसांनी बुलेटस्वाराची समजूत घालून त्याला बाजूला घेतले. मात्र, बघ्यांची मोठी गर्दी जमा झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. 

बुलेटस्वार मद्यप्राशन केलेला असल्याने पोलिसांनी ब्रीथ अल्कोहोल ॲनालायझरने त्याची तपासणी केली. मात्र, तो प्रतिसाद देत नसल्याने पोलिसांनी त्याला समजावत त्याच्याच बुलेटवर बसवून एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेत नेले. तेथे त्याची बुलेट जप्त करून त्याच्यावर मोटार वाहन कायद्यान्वये (कलम १८५) कारवाई केली. त्यानंतर त्याला नोटीस देऊन न्यायालयासमोर हजर राहण्यास बजावले आहे. 

वाहनचालकांनी शिस्त पाळणे आवश्‍यक आहे. वाहतूक पोलिसांनी थांबविले तर त्यांना सहकार्य केले पाहिजे. बुलेटस्वाराने उद्धट वर्तन केले. त्याने मद्यप्राशन केल्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. 
- हनुमंत गिरमे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, सिडको

Web Title: Drinker Bullet rider arrested in aurangabad