डॉ. केंद्रे व डॉ. कोल्हे यांचेही मृत्यू चर्चेत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

औरंगाबाद/जळगाव - नाशिक रोड कारागृहातील डॉ. बळिराम शिंदे याचा मृत्यू व त्याच्यावरील उपचाराशी डॉ. सुदाम मुंडे याच्या संबंधाच्या संशयामुळे परळीच्या स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणातील मुंडेचे दोन सहआरोपी, पहिला त्याचा सख्खा मेहुणा डॉ. अंगद केंद्रे व दुसरा जळगावचा डॉ. राहुल कोल्हे यांचे मृत्यूही चर्चेत आले आहेत. डॉ. सरस्वती मुंडेचा भाऊ अंगद याने जुलै 2012 मध्ये जामिनावर सुटल्याच्या दिवशी आत्महत्या केली तर डॉ. राहुल कोल्हे याचा डिसेंबर 2013 मध्ये अपघाती मृत्यू झाला. 

औरंगाबाद/जळगाव - नाशिक रोड कारागृहातील डॉ. बळिराम शिंदे याचा मृत्यू व त्याच्यावरील उपचाराशी डॉ. सुदाम मुंडे याच्या संबंधाच्या संशयामुळे परळीच्या स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणातील मुंडेचे दोन सहआरोपी, पहिला त्याचा सख्खा मेहुणा डॉ. अंगद केंद्रे व दुसरा जळगावचा डॉ. राहुल कोल्हे यांचे मृत्यूही चर्चेत आले आहेत. डॉ. सरस्वती मुंडेचा भाऊ अंगद याने जुलै 2012 मध्ये जामिनावर सुटल्याच्या दिवशी आत्महत्या केली तर डॉ. राहुल कोल्हे याचा डिसेंबर 2013 मध्ये अपघाती मृत्यू झाला. 

अंगद केंद्रे याची आत्महत्या हा या प्रकरणाशी संबंधित पहिला मृत्यू होता. तेव्हाही शंका उपस्थित झाली होती. तथापि, डॉ. कोल्हे याच्या मृत्यूनंतर तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना षड्‌यंत्राचा संशय का आला नाही, स्त्रीभ्रूणहत्यांसारख्या भयंकर सामाजिक अपराधाचा तपास करणारी पोलिस यंत्रणा झोपली होती का, असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. या मृत्यूंचा पुरेसा तपास झाला नाही. शिवाय मुंडेच्या यंत्रणेतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या धमक्‍या मिळत असल्याने साक्षीदार फितूर होऊ लागले. अगदी मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपातावेळी मरण पावलेल्या विजयमाला पटेकर हिचेही नातेवाईक फितूर झाले. परिणामी, बीड, जळगाव आदी ठिकाणचे संबंधित न्यायालयीन खटले पांगळे बनल्याचे चित्र आहे. सहा वर्षे व्हायला आली तरी देशभर गाजलेल्या मुंडे प्रकरणात अद्याप न्यायालयाचा निकाल आलेला नाही. 

राज्याच्या अनेक भागांत मुलींचे जीव गर्भातच संपविण्याचा जो गोरखधंदा सुरू होता, त्यात मुंडेसोबत डॉ. कोल्हे व इतरही अनेक महाभाग सहभागी होते. मुंडेचा मेहुणा डॉ. अंगद केंद्रे हाच त्याचा हा धंदा सांभाळायचा. मुंडे दांपत्य फरार असताना, कुत्र्यांना गर्भ खाऊ घालण्याच्या संशयावरून पोलिसांनी अंगद केंद्रे याच्या शेतातल्या घराची झडती घेतली होती. 18 जूनला त्याला अटक झाली. 24 जुलै 2012 ला अंबाजोगाई न्यायालयातून जामिनावर सुटल्याच्या दिवशीच परळीजवळ नंदागौळ शिवारात त्याने विष प्राशनाने आत्महत्या केली. 

परळीला सरस्वती व सुदाम मुंडे या दांपत्याच्या मुसक्‍या आवळल्यानंतर बीड-जळगाव कनेक्‍शन उजेडात आले होते. अंबाजोगाईच्या तत्कालीन पोलिस उपअधीक्षक स्वाती भोर यांच्या पथकाने जळगावात राहुल कोल्हे याच्या पद्मावती हॉस्पिटलची झडती घेतली व त्यात मराठवाड्यातील गरोदर माता गर्भलिंगनिदान व गर्भपातासाठी जळगावला पाठविण्यात येत होत्या, असे उजेडात आले. त्यानंतर कोल्हेला सहआरोपी करण्यात आले. 

शुक्रवार, ता. 6 डिसेंबर 2013 ला राहुल कोल्हे तपासासाठी अंबाजोगाईला गेला होता. तेथून तो एकटाच स्वत:च्या स्विफ्ट कारने (एमएच 19 एपी 1259) परत येत असताना औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर सिल्लोडजवळ आळंद शिवारात कुवरखेडी फाट्यावर रात्री उशिरा त्याचा अपघात झाला व त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. वडोदबाजार पोलिस ठाण्यात त्यासंदर्भात गुन्हा दाखल आहे. अपघातावेळी त्याने मद्यप्राशन केल्याचे व त्यामुळेच त्याची गाडी झाडाला धडकल्याचे सांगितले गेले. स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणांमध्ये डॉक्‍टरांची समाजात प्रचंड बदनामी होते. शिवाय अशा मृत्यूनंतर मागे राहिलेल्या कुटुंबीयांच्या अडचणी वेगळ्याच असतात. कदाचित मुंडेच्या दहशतीमुळेच डॉ. राहुल कोल्हे याची पत्नी डॉ. हेमांगी यांनी अपघाती मृत्यूबाबत संशय व्यक्‍त केला नसावा. डॉ. बळिराम शिंदे यांच्या कुटुंबीयांनीही कारागृहातील मृत्यूचा विषय आमच्यासाठी संपल्याचे सांगितले, हे उल्लेखनीय. 

Web Title: Dr.kendre and Dr. kolhe death in the discussion