ताटातली भाकरही महागली

पांडुरंग उगले
रविवार, 6 जानेवारी 2019

माजलगाव - निसर्गाची अवकृपा झाल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पावसाअभावी रब्बीची पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे अगोदरच दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांसह गोरगरीब मजुरांची भाकरीही महागल्याने आता जगायचं कसं, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

माजलगाव - निसर्गाची अवकृपा झाल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पावसाअभावी रब्बीची पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे अगोदरच दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांसह गोरगरीब मजुरांची भाकरीही महागल्याने आता जगायचं कसं, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

यावर्षी झालेल्या अत्यल्प प्रर्जन्यमानामुळे दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भर पावसाळ्यातच पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला. सोयाबीन, मूग, उडिदाचे उत्पादन निम्म्याने घटले. पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाच्या पहिल्या वेचणीतच पऱ्हाट्या झाल्या. एक एकरात दोन क्विंटलही कापूस निघाला नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच दुष्काळ पाय पसरीत असल्याने याचा विविध भागांवर परिणाम होत आहे. पावसाअभावी भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालावल्याने हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पोळा सणानंतर पाऊस पडला नसल्याने रब्बीतील गहू, ज्वारी, बाजरीची पेरणीच न झाल्याने उत्पादन शून्यावर येणार आहे. यामुळे उन्हाळ्यापूर्वीच अन्नधान्याच्या भावात झपाट्याने वाढ झाली आहे. गतवर्षीपेक्षा ज्वारी, बाजरीच्या किमतीत दुपटीने, तर गहू दीडपटीने महागला आहे. अगोदरच शेतकरी, मजूर पाणीटंचाई, जनावरांचा चारा, आर्थिक समस्यांचा सामना करीत असताना आता त्यांच्या ताटातली भाकरही महागली आहे. यामुळे आता जगायचं कसं, असा प्रश्न निर्माण होत आहे.

अन्नधान्याची भाववाढ
सध्या मोंढ्यातील अन्नधान्याच्या किमतींत खालीलप्रमाणे भाववाढ झाली आहे. (कंसात जानेवारी २०१८चे भाव)

 ज्वारी - सरासरी साडेतीन हजार रुपये क्विंटल (एक हजार ६०० रुपये)
 बाजरी - तीन हजार ३०० रुपये क्विंटल (एक हजार ४०० रुपये)
 गहू - दोन हजार १५० रुपये क्विंटल (एक हजार ५०० रुपये)

एकीकडे शेतात काम नसल्याने सध्या रोजगार मिळत नाही, तर दुसरीकडे रोजच्या भाकरीसाठी लागणाऱ्या ज्वारी, बाजरीचे भाव वाढले आहेत. गोरगरिबांनी कसं जगावं?
- सुशीलाबाई बादाडे, शेतमजूर.

Web Title: Drought Agriculture Loss Water Shortage