दुष्काळाचा बोलविता धनी कोण?

Latur
Latur

नांदेडवरून लातूरला जाणारा रस्ता पाहून ‘नितीन गडकरी की जय’ असे म्हणायचा मोह मलाही आवरला नव्हता. मागच्या वर्षी जिथे याच रस्त्याने साडेतीन-चार तास लागायचे, तिथे आता दोन-अडीच तास लागतात. औसा येथे नरेंद्र मोदी यांच्या सभेत होतो. सभेला गर्दी होती. लोक आणायचे नियोजन आमदाराकडे होते. लोकसभेचे बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवारापेक्षा विधानसभेसाठी इच्छुक असणारे गर्दी जमवण्यासाठी किती मेहनत घेतात, हे विचारू नका.

निवळी गावात गेल्यानंतर तेथे गावकरी जमले. सोबत रामेश्वर धुमाळ होते. निवळी या वर्षी पहिल्यांदा दुष्काळाला सामोरे जाणार आहे. या वर्षी दोन टक्के पाऊस पडला होता. गावातले प्रताप पाटील; वय वर्षे ७६. आयुष्यात त्यांनी बाहेरचे पाणी कधी पिण्यासाठी वापरले नव्हते. पण, यंदा ते टॅंकरने येणारे पाणी पीत आहेत... माणसाच्या पाण्याचा प्रश्न सुटतोय. पण, जनावरे इतर ठिकाणी पाठविल्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रताप पाटील यांनी सांगितले. सरपंच विशाल पाटील सांगत होते की, पाच टॅंकरची मागणी केली.

पण, एक टॅंकर दिला. ज्याच्या विहिरीत पाणी आहे, त्याचे पाणी शासन विकत घेते. पण, त्यांना पैसे कवडीमोल भावाने देते. त्यामुळे अनेक जण पाणी असूनही पाणी देत नाहीत. सधन शेतकरी आत्माराम ढोकळे सांगत होते, की मी उसाचे उत्पादन घेतले. पण, यंदा चांगला भाव मिळत नसल्याचे हताश आहे. सूरज शिंदे, कानोबा शिंदे, करण शिंदे देखील हेच सांगत होते,की गाव समृद्ध आहे, आसपास बंधारेच बंधारे आहेत. पण, आडातच नसेल तर पोहऱ्यात येईल कुठून? कुठलाही नेता; मग आमदार असो वा खासदार, हा गावातला प्रश्न सुटेल यासाठी पुढे येत नाही, गावात फिरकत नाही, असे हे सर्व सांगत होते.

निवळीतल्या धनराज माने यांची वेगळीच कैफियत. साखर कारखान्यामुळे पाणीही विष बनल्याचे माने यांनी सांगितले. त्यांनी विहिरीतल्या पंपाचे बटन दाबताच काळंभोर पाणी यायला लागले. हे पाहून आम्ही अवाक्‌ झालो. 
दुष्काळ एकीकडे घिरट्या घालतोय, तर दुसरीकडे व्यवस्थाही नसल्यामुळे दुष्काळाची तीव्रता अधिक भासते. गावातले उद्योग पाण्याअभावी ठप्प होते. हे निवळीमधले चित्र नाही, तर बहुतांश भागांत हेच चित्र. लातूरच्या लोकसभा निवडणूक प्रचारातून पाणी, दुष्काळ, बंद पडलेले उद्योगधंदे आणि कोलमडलेले प्रशासन, हे विषय ककुठेच नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com