दुष्काळामुळं ऱ्हायली लेकींची लग्नं

सुषेन जाधव
मंगळवार, 2 एप्रिल 2019

मजुरीवर पोटं भरतो. यंदा लेकींची लग्नं केली असती; पण आधीच्या लेकींच्या लग्नाचे कर्ज फेडणं होत नाही. सरकारने काहीतरी योजना आणावी.
- नंदा शिंदे, ताहेरपूर

औरंगाबाद - दिवसेंदिवस दुष्काळाच्या वाढत्या भीषणतेमुळे मराठवाड्यातील गावे भकास होत आहेत. मिळेल त्या कामासाठी किमान पोट भरेल, या आशेने लोकं गावं, घरं सोडताहेत; पण औरंगाबाद (ताहेरपूर, ता. पैठण) या गावातील कहाणी जरा वेगळीच आहे. दुष्काळामुळे येथील लेकींची लग्नं राहिली आहेत.

मुली मोठ्या झाल्या, की आई-वडिलांना चिंता लागते ती सोयरीक अन्‌ लग्नाची; मात्र येथील शिंदे कुटुंबीयांसह अनेकांना चिंता लागली ती मुलींची लग्नं करायची कशी याची? भूमिहीन असलेल्या नंदा शिंदेही तिथल्याच. त्यांना चार मुली. पैकी दोघींची लग्ने बचत गटाचे कर्ज घेऊन लावून दिली. दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून त्यांचा चरितार्थ चालायचा; मात्र यंदा पाऊस नाही. शेतंही रिकामीच पडलेली. कामे नाहीत, रोजगार नाही, त्यामुळं जगायचं कसं? हा प्रश्‍न उभा राहिल्याचे त्या म्हणाल्या. 

दुष्काळाने थांबविली लग्नं
नंदा सांगत होत्या, ‘‘मला चार मुली हायत्या. बचत गटाचं कर्ज घिवून दोघींची लग्नं क्‍याल्यात. आता कर्जाचा हप्ताबी फ्याडला जायनाय. जयश्री आणि पूजा या दोन्ही लेकींनाबी पावणंरावळं ईच्यारत्यात; पण आता हिंमतच ऱ्हायली नै. दुष्काळानी सगळं अवघड करून ठिवलंय हे सांगताना नंदा भावुक झाल्या. 

आठवड्याचंबी भागंना
नंदा यांची तिसरी मुलगी जयश्री. तिला शिकायची खूप इच्छा होती; पण गरिबीमुळे तिचं स्वप्न अधुरंच राहिलं. तिच्या वडिलांनी अगोदर एमआयडीसीमध्ये काम केलं. सध्या ते रस्त्याच्या पुलाच्या कामावर जातात; मात्र तिथं परप्रांतीय मजुरांना प्राधान्य दिलं जातं. जेव्हा ते मजूर नसतील तेव्हा आठवड्यातून एखादा दिवस काम मिळतं त्या दिवसाचा रोजगार पुढच्या हप्त्यात मिळतो. त्यामुळं काम केलं तरी आठवड्याचंबी भागत नाही, अशी जयश्रीने खंत व्यक्त केली. 

‘रोजगारा’ची हमी द्या 
अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा मागणीप्रमाणे गावात रोजगार हमीची कामे सुरू होतात; मात्र अजूनही ताहेरपूरमध्ये तसं काहीच झालं नाही, अक्षरशः एकेक दिवस उपाशीच झोपावं लागतं, असे नंदा शिंदे यांनी सांगितले. रोजगाराची हमी दिल्यास जगणं तरी शक्‍य होईल, उपाशीपोटी अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

प्रशासनाची अनास्था
ग्रामीण भागात एकवेळचे पोट भरण्याचा प्रश्‍न असताना प्रशासनाच्या अनास्थेमुळे रोजगार हमीची कामे सुरू होत नाहीत. अधिकारी, लोकप्रतिनिधी निवडणुकीत गुंतले आहेत. यामुळे गरिबांना जगण्याचा हक्क नाही का, हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे.

Web Title: Drought Daughter Marriage Work