ओला दुष्काळ बरा, कोरडा नको रे बाबा !

Drought
Drought

‘‘दुष्काळ आमच्या मानगुटीलाच बसलेला हाय. त्यो काय पाठ सोडायला तयार न्हाई. औंदा तं पानकळ्यातबी दुष्काळाचे चटके बसलेत. दुष्काळाच्या झळा सोसताना जीव कासावीस झालाया. ओला दुष्काळ बरा; पण कोरडा नको रे बाबा !’’ माहुली (ता. गंगापूर) शिवारातील शेतकरी एकनाथ लांडे उदासपणे दुष्काळाची कहाणी सांगत होते. ‘यंदाचं साल बरं येईल, पाऊसपाणी पडंल, आबादानी व्हईन या आशेनं मशागत केली. पेरणी करून काळ्या आईची ओटी भरली; पण पाऊस काय इकडं फिरकला न्हाय. दरवर्षी हेच चालू हाय.’’ हताशपणे त्यांनी व्यथा मांडली. 

लक्ष्मण भोसले यांनी दुष्काळाचे बारकावे सांगितले. ते म्हणाले, ‘‘कोरड्या दुष्काळात पिण्याच्या पाण्यापासून साऱ्याच गोष्टींवर फरक पडतो. जनावरांना चारा-पाणी कुठून आणायचा हेच कळत न्हाय. दुधदुभत्याचा जोडधंदा पार बसून गेलाय. कोरडवाहू शेतकऱ्यांचे लई हाल होत्यात. १९७२ च्या दुष्काळाच्या आठवणी जागवताना जुने जाणते शेतकरी मनोहर माघाडे म्हणाले, ‘१९७२ च्या दुष्काळात धान्य नव्हतं. रोजगार अपुराचं व्हता. तव्हा दुष्काळी कामावरच्या लोकांची वणवण पाहवत नव्हती. स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळवायला दोन दिवस रांगेत उभं राहावं लागायचं.

सरकारनं काम दिलं. माणस जिवंत राहतील एवढंच धान्य मिळायचं. पोटभर अन्न नव्हतं मिळत. उन्हात काम करावं लागायचं. पर तव्हा कसंका होत न्हाई पाणी मिळायचं.

१९७२ चा दुष्काळ नव्या पिढीला म्हाईत न्हाय. आम्ही मातर सोसलाय. आता पाणी वाहून आणायला साधनं तरी हाईत. तव्हा बैलगाडीवर बॅरल ठेवून, दुष्काळाच्या कामावर पाणी मिळत होतं. लाल मिलो, किडकी जवारी, लाल तांदूळ मिळायचा. त्योबी रेशन कार्डवर एका कुटुंबाला  आठवड्यात चार किलोच द्यायचे. खाणारी तोंडे जादा अन्‌ धान्य कमी अशी अवस्था होती. तव्हा उपासमारीत दुष्काळ गेला. आताच्या दुष्काळात शेतात धान्य पिकलं न्हाय, पर ते इकडून-तिकडून मिळतंय. त्याची टंचाई न्हाय जाणवत. टंचाई हाय ती पाण्याची अन्‌ त्यामुळं जीव कासावीस व्हाया लागलाय.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com