दुष्काळाची खाई, त्यात औषधटंचाई

Medicine
Medicine

औरंगाबाद - दुष्काळात शेतातील उभी पिके गेली. हाती खर्चही आला नाही. वर्षाचे आर्थिक गाडे बिघडले. त्यात सरकारी रुग्णालयांतही औषधींचा दुष्काळ असल्याने रुग्णांचे कंबरडे मोडले आहे. सरकारी रुग्णालयांत नोंदणी शुल्कात केवळ डॉक्‍टरांचे प्रिस्क्रिप्शन मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, आर्थिक दुर्बल नडला गेला आहे.

जिल्ह्यात दहा ग्रामीण आणि तीन उपजिल्हा रुग्णालये आहेत. शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रांची उपलब्धता आहे. सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात हजार ते बाराशे, वैजापुरात सहाशेवर तर गंगापुरातील रुग्णालयात सातशे त आठशे दररोजची ओपीडी आहे. जिल्हा रुग्णालयाची ओपीडीही सातशेवर पोचली आहे. ग्रामीण रुग्णालयात सरासरी दोनशे ते तीनशे रुग्णांची नोंदणी होते. एकूण दररोजची ओपीडी पाच हजारांहून अधिक आहे. 

तिथे ओपीडीसाठी लागणाऱ्या अत्यावश्‍यक पंधरा औषधींपैकी सातपेक्षा कमी औषधांची उपलब्धता आहे, तर आंतररुग्ण व सर्जिकल साहित्याचा दुष्काळ गेल्या वर्षभरापासून कायम आहे. सध्या ७४० पैकी केवळ ३५ औषधींचा पुरवठा केलेला आहे. तो पुरवठाही टप्प्या-टप्प्याने होत असल्याने वितरणात अडचणी येत असल्याचे मुख्य औषधनिर्माण अधिकारी एफ. बी. शेख म्हणाले. ताप, सर्दी, खोकल्याच्या काही औषधी मिळाल्या, तर केवळ सलाईनचा वर्षभर पुरेल एवढा पुरवठा झालेला असल्याचे त्यांनी नमूद केले.

औषधी खरेदी प्रक्रिया हाफकिनने पूर्ण केली. ऑर्डरही दिल्या; मात्र क्वारंटाईनमध्ये औषधी अडकल्याने पुरवठा थांबला आहे. पुरवठा झाला तरी औषधी प्रशासनाकडून मानवी उपयोगिता प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय त्याचा उपयोग करता येत नाही. याला चार ते सहा आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर पुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. 
- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक, औरंगाबाद.

 ७४० पैकी केवळ ३५ औषधांचा पुरवठा
 ओपीडीसाठी पंधरापैकी किमान अर्धीही मिळेनात
 आंतररुग्णांची खासगी मेडिकलवर मदार
 वर्षभरापासून परिस्थिती रुळावर येईना 
 सर्जिकल साहित्याचा भार रुग्णांना पेलवेना

घाटीतही ‘दुष्काळ’
शहरासह ग्रामीण भागातील पंधराहून अधिक जिल्ह्यांचे आरोग्य संभाळणाऱ्या घाटीला औषध टंचाईची झळ सोसावी लागत आहे. घाटीचे शहागंज येथील शहरी आरोग्य केंद्र व पैठण येथील तीस खाटांचे ग्रामीण आरोग्य केंद्र येथे वर्षभरापासून औषधींचा दुष्काळ आजही कायम आहे. 
घाटीत दररोज तीन हजारांवर ओपीडी तर दोन हजार आंतररुग्ण विभागात उपचार घेतात. शिवाय शहागंज येथे तीनशे तर पैठणच्या आरोग्य केंद्रात पाचशेहून अधिक रुग्णांची नोंदणी होते. घाटीला अत्यावश्‍यक १४३ व आवश्‍यक दोन हजार औषधींपैकी आतापर्यंत दहा टक्केही पुरवठा झालेला नाही. पालकमंत्री, आरोग्य सचिव आणि डीएमईआरच्या संचालकांनी वेळोवळी पंधरा दिवसांत औषधपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली. मात्र, त्यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही.  

सर्जिकल साहित्याचा भार 
घाटीत दररोज साठ ते सत्तर प्रसूती आणि वीसच्या जवळपास ऑपरेशन होतात. त्यासाठी लागणाऱ्या औषधी साहित्याचा भार सर्वसामान्य रुग्णांना सोसवेनासा झाला आहे. वर्षभरापासून अमृत, जेनेरिक मेडिकल स्टोअर्सला जागा देऊनही ते घाटीत सुरू झाले नसल्याने केवळ एमआरपीवर विक्री करणाऱ्या जीवनधारा व खासगी मेडिकलवरच रुग्णांची मदार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com