शिवसेनेकडून दुष्काळात दिलासा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

राज्यात शिवसेना सत्तेत सामील झाली तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पक्षाने कायम सरकारशी दोन हात केले. सत्तेत असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारशी भांडताना जलसंधारण, सामुदायिक विवाह, आरोग्य शिबिरे अशा माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली; पण बीड जिल्ह्यात चारा छावण्यांतील घोटाळ्यात पक्षाच्या बड्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आल्याने पक्षाची बदनामी झाली आहे.

बीड - राज्यात शिवसेना सत्तेत सामील झाली तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पक्षाने कायम सरकारशी दोन हात केले. सत्तेत असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारशी भांडताना जलसंधारण, सामुदायिक विवाह, आरोग्य शिबिरे अशा माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली; पण बीड जिल्ह्यात चारा छावण्यांतील घोटाळ्यात पक्षाच्या बड्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आल्याने पक्षाची बदनामी झाली आहे.

एकीकडे पक्षाने दुष्काळी शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन मिळविलेली सहानुभूती पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या या प्रतापाने एका झटक्‍यात मातीत मिळविली आहे. परिणामी, पक्षाची बदनामी झाल्याची दखल पक्षपातळीवर घेतली गेल्याची माहिती असून, यामुळे आता पदाधिकारी बदलाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. 

जिल्ह्यात एकेकाळी युतीत शिवसेना भाजपचा मोठा भाऊ मानली जात होती. सात विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेनेकडे चार, तर भाजपकडे तीन असे समीकरण होते. जिल्ह्यात पक्षाच्या आमदारांना मंत्रिपदही मिळाले. नंतर भाजपकडून गळचेपी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांचे स्वहिताचे धोरण यामुळे पक्षाची ताकद दिवसेंदिवस कमी होत गेली. राज्यात भाजप-शिवसेनेतून विस्तव आडवा जात नसताना शिवसेनेची भूमिका मांडणाऱ्यांच्या हाती तुरी तर भाजप नेत्यांच्या मागे पुढे फिरणाऱ्यांना मात्र सत्तेचा वाटा मिळाला. दरम्यान, यंदाही चारा छावण्या मंजुरीला पालकमंत्र्यांची संमतीची मेख सरकारने मारली. त्यामुळे मंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांप्रमाणे शिवसेनेच्याच मात्र स्वत:च्या मर्जीतल्या काही पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर छावण्या मंजूर केल्या. मात्र, छावण्यांत जनावरांची संख्या वाढविण्याच्या प्रतापात सर्वप्रथम शिवसेना पदाधिकाऱ्याचे नाव पुढे आले. अगदी जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हारवाडीच्या छावणीची मान्यताही रद्द केली.

कोल्हारवाडीत छावणी चालविली जाणाऱ्या मत्सगंधा संस्थेच्या नावाने तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात छावण्या आहे. संबंधित पदाधिकारी आपली छावणी नाही असे तांत्रिकदृष्ट्या सांगत असले, तरी या पदाधिकाऱ्यांच्याच छावण्या असल्याचे लपून राहिले नाही. विशेष म्हणजे, जनावरांची संख्या अधिक दाखविल्याचे समोर आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसा पाठविलेल्या छावणीचालक संस्थांच्या यादीत मत्सगंधा संस्थेच्या छावण्यांचा समावेश आहे. त्यामुळे पक्षाने यापूर्वी जलसंधारण, सामुदायिक विवाह, शेतकऱ्यांच्या जनावरांना खुराक वाटप अशी दुष्काळी मदत करून मिळविलेली सहानुभूती पदाधिकाऱ्याच्या कागदोपत्री जनावरे वाढवून शासन तिजोरीवर डल्ला मारण्याच्या प्रतापामुळे धुळीस मिळाली आहे. याची दखल पक्षपातळीवर घेतली गेली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परदेशातून येताच याचा अहवाल त्यांच्याकडे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे पक्षाच्या कार्यकारिणीत खांदेपालटाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. 

Web Title: Drought relief from Shiv Sena