दुष्काळामुळे ८० दिवसच चालणार गळीत हंगाम

पंजाब नवघरे
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

शुक्रवारपासून (ता.२२) राज्यभरातील कारखान्याचे गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात अाला आहे. मात्र, यावर्षी  केवळ ८० ते शंभर दिवसच ऊस गाळप करता येणार असल्याचे राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी ‘सकाळ’शी बोलतांना सांगितले. 

वसमत (जि. हिंगोली) ः राज्यात ऊस गळीत हंगामाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राज्य साखर संघाच्या  पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शुक्रवारपासून (ता.२२) राज्यभरातील कारखान्याचे गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात अाला आहे. मात्र, यावर्षी  केवळ ८० ते शंभर दिवसच ऊस गाळप करता येणार असल्याचे राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी ‘सकाळ’शी बोलतांना सांगितले. 

राज्यातील ऊस गळीत हंगामाबाबत मंगळवारी आज राजभवनात राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, कार्यकारी संचालक संजय खताळ, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, अजित देशमुख यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. 

या बैठकीत राज्यातील गळीत हंगाम ता. २२ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळी श्री. दांडेगावकर यांनी राज्यातील साखर कारखान्यांची परिस्थिती मांडली. कारखान्यांना केंद्र शासनाकडून येणे असलेले सुमारे तेराशे कोटी रुपये अद्यापही देण्यात आलेले नाहीत. तसेच राज्यशासनाने कारखान्यांच्या सॉफ्टलोनचे सुमारे साडेआठशे कोटींचे व्याज दिले नाही. सदर रक्कम कारखान्यांना त्वरीत दिल्यास कारखान्यांना काही प्रमाणात का होईना मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भातील निर्णय नवीन सरकारच घेईल, असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी स्पष्ट केल्याचे श्री. दांडेगावकर यांनी सांगितले. 

राज्यात या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस मिळणे कठीण आहे. त्याचा परिणाम गळीत हंगामावर होणार असून यावर्षी केवळ ८० ते शंभर दिवसच ऊस गाळप करता येणे शक्य होणार असल्याचे श्री. दांडेगावकर यांनी सांगितले. त्यामुळे मागील काही वर्षांत तब्बल दीडशे ते १८० दिवस चालणारे कारखाने आता कमी दिवस चालणार असल्याने त्याचा मजूरांवर देखील परिणाम होणार आहे. कारखान्याच्या विश्वासावर गाव सोडणाऱ्या गावकऱ्यांची यावर्षी तीन महिन्यातच घरवापसी होणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, नवीन मंत्रीमंडळ स्थापन झाल्यानंतर राज्याकडून दिल्या जाणाऱ्या सॉफ्टलोनच्या व्याजाच्या बाबतीतल निर्णय घेतला जाणार असल्याने नवीन सरकार कधी स्थापन होणार याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

वसमत तालुक्यात ऊस लागवड क्षेत्र वाढणार
तालुक्यातील पिकांचे परतीच्या पावसात मोठे नुकसान झाले आहे. मात्र, परतीच्या पावसाने येलदरी, सिद्धेश्‍वर, इसापूर धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या पाण्याचा फायदा घेण्यासाठी शेतकरी आता ऊस पिकाकडे वळले आहेत. उसाची लागवडीही करण्यात येत असून उसाचे बेणे विकत घेतले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drought season which lasts for 3 days due to drought