पीक करपले, पक्षी दूरदेशी गेले, जनावरांना पालापाचोळा खाऊ घालण्याची वेळ 

farmer
farmer

औरंगाबाद : "बहात्तरचा दुष्काळात लयं पाणी व्हतं. आता प्यायला नाई. पहिलं एवढी बोअर आन्‌ ईहिरी नव्हत्या; पण शेंदायला पाणी व्हतं. आता टॅंकरवर धकवत हाओत,'' असं सत्तरीतले कनकोरीचे वसंतराव पवार सांगत होते. गंगापूर तालुक्‍यातील शिवना नदीकाठच्या परिसरात असलेल्या गावाची दुष्काळी स्थिती जाणून घेण्यासाठी जाताना शेळ्या चारायला नेणारे वसंतराव भेटले. "दुष्काळामुळं जनावरं विकली. जी हायेत त्यायला जिथं पालापाचोळा दिसंल, त्योच खाऊ घालत कसबंस जगवतोय,'' हे सांगताना विहिरीच्या तळाप्रमाणे त्यांचा आवाज खोल गेला होता. यंदाच्या दुष्काळात पीक करपलंच; पण अन्न-पाण्याच्या शोधात पक्षीही दूर गेल्याचे चित्र दिसले. 

ते म्हणाले, "चार वर्सांअगुदर कोरडवाहू वावरात निदान पन्नास ते साठ हजार उत्पन्न निघत होतं. आता काईच नाही. जवारी घेतली; पण एकच पोतं झाली. घरात लेकरं लग्नाजोगते झाले; पण आवंदा दुष्काळामुळं अवासानच नाई.'' 

पुढे ढोरेगावहून छायाचित्रकार सचिन माने, बातमीदार जमील पठाण यांच्यासह पेंडापूरकडे निघालो. डोक्‍यावर टोपी, गुडघ्यावर फाटलेला पायजामा, चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या असलेले कपूरचंद राजपूत दिसले. दोन बैल व एक गायीला चराईसाठी ते घेऊन जात होते. राजपूत म्हणाले, "वडिलोपार्जित चार एकर वावर हाय. तेच कसतो. आवंदा चार किलो जवारी पेरली. फकस्त तीन पायल्या झाली. गेलं वरीस बरं होतं. जनावरांसाठी दोनशे पेंढ्या चारा हाय. यामुळे त्यान्ला असं पडीक वावरात चरायला नेत हाय. एक मुलगा पेट्रोलपंपावर काम करतो. त्याच्याच कमाईवर घर चालतं,'' शासकीय मदत मिळते की काय, या आशेनं ते आमच्याकडे आपले दुःख सांगत होते. त्याच ठिकाणी दोन शेळ्या चारायला घेऊन आलेला आठवर्षीय शाहीद शेख भेटला. शाळा सुटल्यावर दुष्काळामुळं त्याला रोज बकऱ्या न्याव्या लागतात. 

रस्त्यात प्रत्येकाने ठेवला ड्रम 
भोईगावात टॅंकरने पाणीपुरवठा होतो. गावातील प्रत्येकाने पाण्याचा ड्रम रस्त्यात ठेवला होता. येथे नियमित दोन ते तीन टॅंकर कायगावातून येतात. पाणी नितळ दिसते; मात्र पिण्यायोग्य नसल्याचे महिलांनी सांगितले. या पाण्यामुळे अंगाला खाज येत असल्याने हे पाणी धुण्या-भांड्यांसाठी वापरले जाते. पिण्यासाठी हंडाभर पाणी दहा रुपयांना विकत आणावे लागते. रोज एका कुटुंबाला दिवसाकाठी दोन ते तीन हंडे लागत असल्याचे त्या महिलेने सांगितले. 

पाणी फक्त डोळ्यांत 
शिवना नदीच्या पात्रापासून दीड किलोमीटरवर कनकोरी गावात नदी-नाले खोलीकरण झाले; मात्र पाऊसच न झाल्यामुळे गावाची भिस्त पूर्णपणे टॅंकरवर आहे. गावातील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग केले असले, तरी त्यांच्या पाठीशी दुष्काळ लागला. त्यामुळे वाताहत झाली. चारा नसल्याने जनावरांनाही विकावे लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com