खोल खोल पाणी... तेही मिळेना!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

''दोन-तीन घागरी पाणी मिळवण्यासाठी तीन तास लागत आहेत. महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाली असून सध्या रात्रंदिवस पाण्यासाठी विहिरीकडे यावे लागत आहे. पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने पाण्यासाठी भांडणे होत आहेत.'' 
- केराबाई विठ्ठल सोनवणे, रा. सोनवणेवाडी, ता. अहमदपूर. 

किनगाव : किनगाव परिसरात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पाण्याचे स्रोत व साठे झपाट्याने आटत आहेत. 

किनगाव ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या सोनवणेवाडी या गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. साडेतीनशे लोकवस्ती असलेल्या सोनवणेवाडी येथे विंधन विहिरीचे पाणी गावातील विहिरीत सोडून पाणीपुरवठा केला जातो.

चाळीस फूट खोल असलेली विहीर कोरडी पडली असून विंधन विहिरीचे पाणी कमी झाल्याने विहिरीत एखादी घागर पाणी पडले तर एका वेळी दहा दहा घागरी विहिरीत सोडून पाणी काढण्यासाठी गावकरी कसरती करीत आहेत. गावातील महिला, पुरुष रात्रंदिवस विहिरीवर लेकराबाळांसह पाणी मिळवण्यासाठी धडपड करीत आहेत. 

''आठ दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीच्या वतीने अहमदपूर पंचायत समितीला सोनवणेवाडीतील पाणीटंचाईसंदर्भात कळवले असून टॅंकरची मागणी केली आहे.'' 
- विठ्ठल बोडके, सरपंच, किनगाव, ता. अहमदपूर.

Web Title: Drought situation at Kingaon in Marathwada