ज्वारीच्या कोठारात स्वप्नांचा पाचोळा

osmanabad
osmanabad

औरंगाबाद : दुष्काळामुळे बागा जळाल्या, जनावरे उपाशीपोटी दावणीला बांधावी लागताहेत, लेकींची लग्ने राहिली ईतकेच नव्हे तर आता जगायचं कसं अशी चिंता लागली आहे, अशी भावना परंडा तालूक्‍यातील शेतकरी (जि. उस्मानाबाद) व्यक्त करत आहेत. ज्वारीचे कोठार या नावाने परंडा तालूक्‍याची राज्यात ओळख असली तरी दुष्काळामुळे केवळ चार टक्के पेरणी झालेल्या या तालूक्‍यात कडब्याची एक पेंडी आता 35 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे बहूतांशी शेतकऱ्यांनी आता जनावरे विकली, तर काहींनी पाहूण्यांकडे पाठविली आहेत. 

परंड्याहून बार्शी रस्त्याने जाताना वारदवाडी फाट्याजवळ वाकडी हे गाव लागते. रस्त्याच्या बाजूलाच संभाजी बानगुडे यांची एक एकर केळीची बाग दिसते. बाग कसली आता नुसता पालापाचोळा झालेला. ग्रीन नेट लाऊन सावली केलेलं माऊली हॉटेल असं चहाटपरीवजा हॉटेल त्याचं हॉटेल दिसतं. तिथे थांबलो तसं सात वर्षाच्या मुलाचा अभ्यास घेत असलेले बानगुडे जवळ आले. काय म्हणतोय दुष्काळ ? असं विचारताच त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड चिंता दिसली. संभाजी यांच्यासारखेच परिसरात दर शंभर एक मीटर अंतरावर केळी उत्पादक शेतकरी दिसतात, मात्र पाण्याअभावी सर्वांच्या बागा जळाल्या आहेत. 

दुष्काळ येतोच पण मार्ग निघत का नाही 
संभाजी यांनी 2017 मध्ये एक एकर केळीची बाग (1350 झाडे) लावली, रोपे, ड्रीप, औषधे, खत आदिंचा 85 हजारावर खर्च छाला. यातून साधारण अडीच लाख रुपये नफा उरला. यंदा तर यापैकी कशाचाच खर्च नव्हता, शिवाय यंदा सेंद्रीय बाग केली होती. मात्र ऐन फळ लागण्याच्या हंगामात पाणी कमी पडले, आणि आता अशी परिस्थिती आली की, फळांच्या ओझ्याने केळीची झाडे खाली पडली, पुरेशा ओलीअभावी झाडांत रस उरला नाही, आता मात्र त्या जमीनदोस्त झालेल्या फळांकडे बघून नुसतं पोटात गोळा येतो असे संभाजी सांगत होते. एका वर्षाआड दुष्काळ येत म्हणतेत मग यावर अगोदरच उपाययोजना का होत नाहीत ? असा सवाल करत संभाजी यांनी एकप्रकारचे आव्हानच दिले. 

.....म्हणून राजकीय नेतृत्व प्रगल्भ हवे 
संभाजी यांनी दुष्काळाची सांगड राजकारणाशी का लावली हे सुरवातीला मला उमजले नाही, मात्र ते जसे पुढे बोलत होते, तसे काही गोष्टी विचार करण्यासारख्या होत्या. संभाजी सांगत होते, " माझ्या गावच्या बाजूलाच उपळाई ठोंगे (ता. बार्शी) हे गाव आहे. भौगोलिकदृष्ठ्या हे गाव मराठवाड्यात नसलं तरी काय झालं, उजनी धरणातून बोगद्याने सिना नदीत पाणी आणलं, त्यातून उपसा सिंचनने उपळाईला पाणी आणलंय आणि आमच्या उशाला चांदणी प्रकल्प असूनही आम्ही तन्हाजलेलोय. आज दुष्काळ असला म्हणून कै झालं, याच चांदणी प्रकल्पातून माझ्या बागेशेजारनं बार्शीला पाणी जायचं तवा आमचे राजकारणी नेते कुठं गुडूप झाल्ते. उपळाईसारखं आमचंही निम्म शिवार हिरवं झालं असतं तर मुक्‍या त्रिबाचातरी आर्शिवाद लागला असता. त्यामुळं किमान राजकीय नेतृत्वतरी प्रगल्भ हवं असं म्हणताना त्यांच्या मनात राग आणखीनच धुमसत होता. 

जनावरे उपाशीपोटी दावणीला बांधतात 
ऊस तूटून गेल्यानंतर पाचोळ्यात राहिलेली टिपरी जनावरं हूडकून खात्यात, तवा त्यांची काळजी लागती, अजून दोन अडीच महिनं कसं जगायचं आणि जगवायचं हा नुसता विचार जरी मनात आला तरी करमत नाही, दिवसभर टिपऱ्यावर राहून सांच्याला जनवरांला उपाशीपोटी दावणीला बांधतो असं सांगताना संभाजीचा चिमुकला मुलगा त्यांच्याकडे किलकिल्या डोळ्यांनी पहात होता. त्याला कळत नसले तरी बापाच्या डोळ्यातून ओघळणारं आसवं त्याला बरंच काही सांगत होते. 

तालूक्‍यात 13 छावण्या प्रस्तावित 
परंडा तालूक्‍यात जनावरांच्या 13 चारा छावण्यांचा प्रस्ताव तालूका स्तरावरुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. मात्र तालूक्‍यातील राजकीय नेतृत्व आपली पोळी भाजण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याचे नाव न घेण्याच्या अटीवर सांगण्यात आले. 

कारखान्याने ऊस नेऊन बरेच दिवस झाले तरी अजून पहिलाही हप्ता नाही, दुष्काळात किमान त्याचा तरी आधार झाला असता, चारा, पाण्याचा प्रश्‍न बिकट झाला आहे, प्रशासनाने केवळ बघ्याची भुमिका घेतली आहे. 
- संभाजी बानगुडे, शेतकरी (रा. वाकडी, ता. परंडा) 

माझं साधारण 75 वर्ष वय आहे, या वयातही रानात काम केल्याशिवाय पर्याय नाही, मुलगा अपंग आहे, त्याच्याकडे पाच सहा गायी आहेत, कडब्याची पेंडी 35 मिळतीय छावण्याचं सोडा किमान दावणीला जरी चारा मिळाला तरी पुरेसं आहे. 
- केसरबाई कारभारी, शेतकरी, वाकडी 

दिवस उगवायला रानात येतो, पण पाला पाचोळ्याशिवाय रानात काहीच नाही, रानं काळी ऱ्हायल्यात, प्यायलाच पाणी नाही, काळभोर मोकळं शिवार बघून राहवत नाही, सरकारी मदत मिळाली तर या वयात हाल होणार नाही. 
- वैजीनाथ कारभारी, शेतकरी, वाकडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com