मोसंबीचे झाले लिंबू!; बाग जगवणे बनले अवघड

औरंगाबाद - भांबर्डा येथे संदीप काळे यांच्या बागेतील मोसंबीचा आकार लिंबाएवढाच राहिला.
औरंगाबाद - भांबर्डा येथे संदीप काळे यांच्या बागेतील मोसंबीचा आकार लिंबाएवढाच राहिला.

औरंगाबाद - गतवर्षी पाऊसपाणी बरे म्हणून उत्पन्न बरे होते. यंदा पाणीच पडले नाही अन्‌ विहिरींनीही साथ सोडली. त्यामुळे मोसंबीच्या बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांना पाणी खरेदी करावे लागत आहे. टॅंकरसाठी पैसे नसले की डोळ्यांपुढे बाग तरळते अन्‌ मग सुरू होतो उसनवारीचा सिलसिला. 

यंदा पावसाने तडाखा दिला आणि विहिरींनाही पाणी राहिलेले नाही. परस, दोन परस असलेले पाणी यंदा अजूनच खपाटीला गेले. विहिरीचे झरेही आता गायब झाले आहेत. उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेली दोन एकर मोसंबीची बाग जगविण्यासाठी भांबर्डा (ता. जि. औरंगाबाद) येथील तरुण शेतकरी संदीप रमेश काळे यांना झुंजावे लागत आहे. गावातच किमान सात ते दहा किलोमीटरवरून पाणी आणावे लागते. गावातील विहिरींचे पाणी पुरत नसल्याने टॅंकरवर अधिक विसंबून राहावे लागत असल्याची माहिती त्यांनी ‘सकाळ’ला दिली. गेल्या वर्षी चाळीस हजारांचे उत्पन्न देणारी मोसंबीची बाग यंदा जगवणे अवघड झाल्याचे त्यांनी सांगितले. 

कसली आली कर्जमाफी? 
राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनेचा आरंभ केला. मात्र त्याचा लाभ किती जणांना मिळाला, याचे उत्तर द्यायला कोणी तयार नाही. या कर्जमाफीबाबत विचारले असता, कसली कर्जमाफी आणि कसले काय? अशी प्रतिक्रीया संदीप काळे यांनी दिली. आपल्या वडिलांनी सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली; पण दमडीही खात्यात जमा झाली नाही, असे त्यांनी खेदाने सांगितले.

एका दिवसाला हजार रुपयांचे पाणी
विहिरीला येणारे पाणी बाग जगविण्यासाठी कमी पडते, तर त्यावर फळे कुठून येणार? ही झाडे जगविण्यासाठी आता टॅंकर घ्यावे लागतात. दिवसाला सरासरी हजार रुपये खर्च होतो. अनेकदा खिशात पैसे नसतात; मात्र पाण्याची तजवीज करावीच लागते. सोय झाली नाही तर मोसंबीची झाडे डोळ्यांसमोर येतात. उसनवारी करून टॅंकरची व्यवस्था करावी लागते. पाऊस यायला मोठा कालावधी असताना यापुढील काळ कसा जाणार, याची चिंता लागल्याचे संदीप सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com