दुस्काळापाई ढोरांपुढं कडू घास

जमील पठाण
सोमवार, 1 एप्रिल 2019

‘डझनावर जनावरं हायतं; पण चाराच नै. अख्खं कुटुंब जनावरांच्या तैनातीत हाय. रोज पंधरा-वीस किलोमीटर पायपीट करून जनावरांपुढं पाचोळा, भुस अन्‌ कडुनिंबाच्या झाडांचा पाला मांडावा लागतोय. दुस्काळापाई ढोरांचा घास कडू झाला.’ जेरीस आणणाऱ्या दुष्काळाचं चित्र मांडलं पेंडापूर (ता. गंगापूर) येथील पशुपालक मज्जीद सरदार शेख यांनी.

कायगाव (जि. औरंगाबाद) - ‘डझनावर जनावरं हायतं; पण चाराच नै. अख्खं कुटुंब जनावरांच्या तैनातीत हाय. रोज पंधरा-वीस किलोमीटर पायपीट करून जनावरांपुढं पाचोळा, भुस अन्‌ कडुनिंबाच्या झाडांचा पाला मांडावा लागतोय. दुस्काळापाई ढोरांचा घास कडू झाला.’ जेरीस आणणाऱ्या दुष्काळाचं चित्र मांडलं पेंडापूर (ता. गंगापूर) येथील पशुपालक मज्जीद सरदार शेख यांनी. 

पेंडापूर येशील पशुपालक मज्जीद सरदार शेख (वय ३९) यांच्याकडे तीन गाई, चार बैल, तीन गोऱ्हे आणि चार शेळ्या आहेत; पण सर्वच जनावरं सध्या जंगलात चारा नसल्याने पाचोळा, भुस अन्‌ शेतातील कडुनिंबाचा पाला खाऊन जगत आहेत. त्यांची स्थिती जाणून घेतल्यानंतर बैलांना हौदात पाणी पाजून घरी बांधलेल्या गोऱ्ह्यासाठी डोक्‍यावर हंडा घेऊन घराकडे निघालेले ज्ञानेश्‍वर ऐटकर भेटले. 

गुरांना टॅंकरचे पाणी विकत घेऊन जगवावे लागत आहे. तर तीसवर्षीय किरण लंगोटे म्हणाले, एकेक दिवस मोठ्या मुश्‍किलीने काढत आहे. कडब्याचे भाव गगनाला अन्‌ पशुधनाला कवडीमोल भाव. त्यामुळे जनावरं ना विक्री करता येईना ना दावणीला उपाशी मारता येईना. गावात भेटलेले विश्‍वनाथ परभणे (वय ६०) म्हणाले, हाताला काम राहिलं नाही, कामासाठी लोक वाळूज एमआयडीसीत जातात. पिण्याच्या पाण्यासाठी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत धावपळ सुरू असल्याचे ते म्हणाले.

उन्हाच्या तीव्रतेमुळे कायगाव टोका परिसरातील गोदावरी नदीच्या पाण्यात घट होत आहे. नदीकाठची गावे सोडली तर तालुक्‍यात भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे प्रशासनाने तालुक्‍यातील प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये चारा छावणी उभारावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

औंदा दुष्काळ असल्याने पीक निघालेच नाही. त्यामुळे स्वतःच्या मुलांप्रमाणे जपलेल्या जनावरांचे चारा-पाण्याअभावी हाल होत आहेत. चारा विकत घेऊन जनावरांचा सांभाळ करीत आहोत.
- मज्जीद शेख, शेतकरी, पेंडापूर

आमच्याकडे आर्थिक फंड नसल्याने आम्ही केवळ आरोग्य सेवा पुरवितो; तसेच शासनातर्फे देण्यात येणाऱ्या चारा वैरणीच्या योजनांची अंमलबजावणी करतोय.
- ए. एस. गवारे, तालुका पशुधन विकास अधिकारी, गंगापूर

Web Title: Drought Water Shortage Animal Fodder