बामणी - परिसरात भीषण पाणीटंचाई असताना देवणी नदीतील डोहात जनावर मरून पडले आहे. पाण्याचा पर्याय नसल्याने शेळ्यांना तेच पाणी प्यावे लागत असून दुसरीकडे महिलेला तिथेच कपडे धुवावे लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
बामणी - परिसरात भीषण पाणीटंचाई असताना देवणी नदीतील डोहात जनावर मरून पडले आहे. पाण्याचा पर्याय नसल्याने शेळ्यांना तेच पाणी प्यावे लागत असून दुसरीकडे महिलेला तिथेच कपडे धुवावे लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

गावांचं पुनर्वसन झालं, जगण्याचं हुईल का?

बामणी - भोकणी (ता. देवणी) मध्यम प्रकल्पामुळं गावांचं पुनर्वसन झालं, दुसरीकडं संसारबी थाटला; पण घोटभर पाण्यासाठी रोज अख्खं गावं हिंडुलालंय. गावांचं झालं, आता एकदाचं जगण्याचं पुनर्वसन हुईल का? अशी भावना बालाजी पाटील यांनी व्यक्त केली.

लातूर जिल्ह्यातल्या उदगीरवरून देवणीकडे जाताना बामणीचे बालाजी हे पोलिस पाटील भेटले. भरउन्हात ते आणि वायरमन सूर्यकांत मुळखिडे उभे होते. दुष्काळ आता रोजचाच झालाय; पण किमान प्यायच्या पाण्याची तरी सोय व्हायला पायजे व्हती, बालाजी सांगत होते. 

पाण्याचे हाल सांगताना बालाजी म्हणाले, की भोकणी मध्यम प्रकल्पासाठी बामणी आणि माणकी (ता. उदगीर) या गावचे साधारण १९९३-९४ मध्ये पुनर्वसन झाले. येणकी गावचाही काही भाग पुनर्वसित आहे; पण आजतागायत इथल्या पिकांच्या (शेतमालाला न मिळणारे भाव), पाण्याच्या, जनावरांच्या चाऱ्याच्या अडचणी सुटलेल्या नाहीत. आता दोन्ही गावे प्यायच्या पाण्यालाही महाग झालीत. साधारण दोन हजारांवर लोकसंख्या असलेल्या बामणी गावात वृद्ध, तरुण आणि लहान लेकरं दिवसभर हंडाभर पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. प्रशासनाने अजूनही गावात टॅंकर सुरू केला नाही. मिळेल तिथून पाणी आणताना दमछाक होते; पण करणार काय अन्‌ सांगणार कोणाला? भोकणी मध्यम प्रकल्पातून उदगीर आणि देवणी तालुक्‍यांसाठी आजवर पाणीपुरवठा होत होता; मात्र जानेवारीपासून तोही बंद झालाय. आता वाघदरीतून पाणीपुरवठा होतोय. असं असले तरी शहरात विकत पाणी घेऊन जगता येतं; पण गावात सगळ्यांची विकत घ्यायची क्षमता नसते, तर कधी विकतही मिळत नाही, मग प्रशासन पावलं का उचलत नाही, असा प्रश्‍नही श्री. पाटील यांनी केला. 

अजून किती हाल होणार? 
पिण्याच्या पाण्याचे हाल, प्रशासनाची अनास्था, जनावरांचे चाऱ्यावाचून हाल, बायकांचा दिवस म्हणजे हंडाभर पाणी असे समीकरण अशा अनेक अडचणींत सापडलेल्या गावांचे अजून किती हाल होणार आहेत? असा प्रश्‍न बामणीच्या गावकऱ्यांना पडला आहे. किमानपक्षी टॅंकरवर तरी तहान भागवावी, अशी अपेक्षा येथील तरुणांनी व्यक्त केली.

या गावांना बसताहेत दुष्काळाचे चटके 
उदगीर आणि देवणी तालुक्‍यातील सावरगाव, होनाळी, भोकणी, माणकी, डोंगरवाडी, कोनाळी, दावणगाव, कमालवाडी, हासनाळ, पंढरपूर, नेकनाळ, तळेगाव, बोरूळ या गावांना सर्वांत जास्त पाणीटंचाईचे चटके बसत असल्याचे पोलिस पाटील बालाजी यांनी सांगितले. यासोबत कर्नाटक सीमेवरच्या लासुना, विजयनगर, सिंदीकमट याही गावांत अशीच परिस्थिती आहे.

प्रशासनाने किमान टॅंकरची तरी व्यवस्था करायला हवी. लोकं मिळेल तिथून पाणी आणतात. जनावरांच्याही चारा-पाण्याचे हाल आहेत.
- बालाजी पाटील, पोलिस पाटील, बामणी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com