Farmer
Farmer

मी कसंबी जगंल, पण जितराबांच काय?

तेरखेडा - साहेब, मी कसं बी जगंल, पण जितराबाचं काय, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत. यंदा रब्बीची पेरणीच झाली नसल्याने जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस चाऱ्याची राखण करावी लागत आहे. जनावरांच्या चाऱ्याला राखण म्हणून शेतात जावे लागते. मात्र, चोऱ्यांच्या अफवांमुळे शेतात जावे तर कोणी अडवेल, न जावे तर जनावरांचा कुणी घेऊन जाईल, अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. बाहेरील तालुक्‍यांतून ज्वारीचा कडबा मागविण्यात येत आहे. शंभर कडब्याच्या पेंढ्यांसाठी तीन ते साडेतीन हजार रुपये मोजावे लागत आहेत. चारा चोरीच्या प्रमाणातही वाढ झालेली आहे. यामुळे शेतकऱ्यांत घबराट निर्माण झालेली आहे.

यंदा कमी प्रमाणात पाऊस पडल्याने बांधावरही चारा जनावरांना उपलब्ध होत नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. अगदी शेकडो एकरांपर्यंत हिरवळ कोठेच दिसून येत नाही. सध्या उसाचा भाव साडेतीन ते चार हजार रुपये टन असा आहे. परंतु, दररोज पैसे कोठून आणायचे? जनावरांना पाणी पाजण्यासाठी अगदी एक ते दोन किलोमीटर दूर जावे लागत असल्याचे चित्र आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या कूपनलिकेला पाणी असते, ते केवळ एखादी घागर भरण्याएवढे, तो स्वत:ची तहान भागवेल की दुसऱ्याला पाणी देईल अशी वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांना जनावरांचे हाल बघवत नसल्याचे शेतकरीवर्गातून बोलले जात आहे. जनावरांना बाजारात विकायचे जरी ठरवले तरी त्यांना मागणीही नाही. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सध्या कडाक्‍याचे ऊन पडत आहे. पिकाच्या भरवशावर केलेले कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्‍न वारंवार शेतकऱ्यांना पडत आहे. शेती जर चांगली पिकली तर व्यवसायही चांगले होतात. परंतु, व्यवसायावरही दुष्काळाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाईही तीव्र जाणवत आहे. बॅंका व महसुलाच्या गोंधळामुळे अनुदान विमा अडकल्यानेही शेतकरी मोठ्या अडचणीत आलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com