पावसाचं दिसलं नाय टिपूस; पण डोळ्यांत टिपं

संदीप लांडगे
शुक्रवार, 29 मार्च 2019

दीडशेपेक्षा जास्त टॅंकर
तालुक्‍याचा विचार करता फक्त महिनाभर पुरेल एवढाच चारा तालुक्‍यात उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. तालुक्‍यात सध्या सुमारे दीड लाखापेक्षा जास्त जनावरे आहेत. जिल्ह्यामध्ये एक हजार टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी एकट्या वैजापूर तालुक्‍यात तब्बल दीडशेपेक्षा जास्त टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

औरंगाबाद - ‘‘अवंदाच्या दुस्काळानं गावातल्या समद्या इहिरी आटल्या, तव्हा पाण्यासाठी मानसागणी जित्राबांचे हाल व्हत्यात. आतापोस्तर लई येळा दुस्काळ पाहिला. ७२ च्या दुस्काळात पाण्याचे एव्हढे हाल नसतील, तेव्हढे आता हैत... जनावरांसाठीचा कडबा चार हजार रुपये शेकडा; तर रुपयाला यक उसाचं वाढ मिळतंय. खाटकाच्या दावणीला जात्याल म्हणून इकू वाटत न्हाय. आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय. अजून सहा महिनं जायच्यात. पुढं तरी चांगला पाऊस पडंल का न्हाय कोण जाणं?’’ वैजापूर तालुक्‍यातील आघूर गावचे काशीनाथ आव्हाळे दुष्काळाची तीव्रता आणि आतापर्यंतचे अनुभव सांगत होते. त्यांच्या बोलण्यातून दुष्काळाची तीव्रता किती गंभीर आहे, हे जाणवत होते. 

वैजापूर तालुक्‍यातील अनेक गावांतील लोकांनी दुष्काळामुळे असलेली हतबलता मांडली. पाऊस नाही, पिके हातची गेली, जगायची चिंता लागलीय, जनावरे कशी जगतील. त्यामुळे सरकारने काही तरी केलं पाहिजे. गेल्या पोळ्यापास्तन पावसाचं टिपूस पडलं नाय, पण दुष्काळानं डोळ्यांत मात्र टिपं आणली, असे परसोडा गावातील द्वारकाबाई जाधव सांगत होत्या. 

आघूरचे शेतकरी मच्छिंद्र आव्हाळे म्हणाले, की आजच एवढी अवघड परिस्थिती झालीय, प्यायला पाणी नाही, पिके वाया गेली. चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे. जनावरे जगवण्याची चिंता लागलीय. काही लोकांनी वैजापूरच्या बाजारात कवडीमोल दराने जनावरे विकायला सुरवात केलीय. अजून सहा महिने जायचेत. पुढं तरी पाऊस पडंलच याचा काय भरोसा. पूर्वी दुष्काळ पडायचा. खायला नव्हतं पण पाणी बक्कळ ऱ्हायचं. आताचे दुष्काळ वेगळे हायेत.

ज्वारीला भाव कमी आहे; पण जनावरांचा चारा म्हणून लागणाऱ्या कडब्याचे भाव गगनाला भिडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसाळ्यातील चाऱ्याची बेगमी करून ठेवण्यासाठी शेतकरी सुक्‍या चाऱ्याच्या खरेदीच्या कामात गुंतला आहे. परंतु चाऱ्याचे भाव कडाडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. चाऱ्याचे उत्पादन कमी झाल्याने प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

वैजापूर तालुक्‍यात जनावरांची संख्या जास्त असल्याने ओल्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागत आहे. चार हजार रुपये शेकडा कडबा मिळत असल्याने पशुधन सांभाळणे अवघड आहे. दुष्काळाचा सर्वाधिक फटका वैजापूर तालुक्‍यातील जरूळ, तिडी, सवंदगाव, रोहेगाव, जरूळ, परसोडा, शिवराई, तिडेवाडी, घायगाव, आघूर या गावांना बसला आहे.

दीडशेपेक्षा जास्त टॅंकर
तालुक्‍याचा विचार करता फक्त महिनाभर पुरेल एवढाच चारा तालुक्‍यात उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. तालुक्‍यात सध्या सुमारे दीड लाखापेक्षा जास्त जनावरे आहेत. जिल्ह्यामध्ये एक हजार टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी एकट्या वैजापूर तालुक्‍यात तब्बल दीडशेपेक्षा जास्त टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

Web Title: Drought Water Shortage Rain Agriculture Fodder