नदीत खड्डे खोदून आणावे लागते पाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

लेणापूरला साठवण टाकी उपलब्ध नसल्याने पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून दुष्काळी परिस्थितीत शासनाच्या विशेष दुरुस्ती योजनेत पाझर तलावात डुबकी खोदण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जिल्हा पाणी पुरवठा विभागाला यासंदर्भात माहिती देण्यात आली असून प्रस्तावावर तातडीने मंजुरी मिळेल.
- ज्योती कवडदेवी, गटविकास अधिकारी, सोयगाव.

सोयगाव - अजिंठ्याच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या आदिवासी लेणापूर-सावरखेड्याला आदिवासी प्रकल्प विभागाची स्वतंत्र साठवण टाकी मंजूर नसल्याने ग्रामस्थांवर नदीपात्रात खड्डे करून पिण्यासाठी पाणी आणण्याची वेळ आली आहे. 

टंचाईग्रस्त आदिवासी लेनापूर-सावरखेडा गावांचा दोन वर्षांपासून आदिवासी विकास प्रकल्पाकडे साठवण टाकीचा प्रस्ताव मंजुरीसाठी धूळखात पडून आहे. संबंधित विभागाकडून ग्रामपंचायत प्रशासनाला साठवण टाकीसाठी निधीच नसल्याचे सांगण्यात येत असल्याची माहिती सरपंच दीपक सपकाळ यांनी दिली.

आदिवासी विभागाकडून टंचाईच्या काळातही साठवण टाकीसाठी निधी नसल्याचे सांगण्यात येत असल्याने गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी नदी पात्रात जावे लागत आहे. सावरखेडा पाझर तलावातून नदीत पाणी सोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. त्यामुळे आता नदीपात्रात खड्डे खोदून ग्रामस्थांना पाणी काढावे लागत आहे. गावात साठवण टाकी नसल्याने नळयोजना रखडली आहे.

पाझर तलावातून सोडलेले पाणी नदीच्या पात्रात येते. या आदिवासी गावात साठवण टाकीअभावी नदीला पाणी सोडावे लागते. या नदीपात्रात पाणी सोडल्यावर अख्खे गाव खड्डे खोदण्यासाठी टीकाव-फावडे घेऊन नदीपात्रात येते. यासाठी ग्रामस्थच नदीचे पात्र स्वच्छ करतात, परंतु वाहून आलेले पाणी दूषित होत असल्याने ग्रामस्थांना हे दूषित पाणी प्यावे लागत आहे.

लेनापूर गावाला साठवण टाकीसाठी निधी नसल्याचे सांगणाऱ्या आदिवासी प्रकल्प विभागाने मात्र यंदा पाणीटंचाईवर उपाययोजनेची कामे वगळता सिमेंट रस्ते, गटारी आदींसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या विभागात ‘चिरीमिरी’ दिल्यास प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळत असल्याचा आरोप सरपंच दीपक सपकाळ यांनी केला आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने दोन वर्षांपूर्वीच आदिवासी-लेणापूर गावाला साठवण टाकीचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे, परंतु आदिवासी प्रकल्प विभागाकडून निधी नसल्याचे सांगून वेळ मारून नेली जात आहे.
- दीपक सपकाळ, सरपंच, लेणापूर-सावरखेडा

Web Title: Drought Water Shortage River Hole