उत्सुकतेपोटी मुले जाताहेत पोर्न व्हिडिओच्या आहारी

Porn-Video
Porn-Video

स्मार्टफोनचा दुरूपयोग बिघडवतो मुलांचे लैंगिक आयुष्य
औरंगाबाद - परिस्थितीमुळे आपल्याला मिळाले नाही, मात्र आता
मुलांना काही कमी पडू द्यायचे नाही अशी बहुतांश पालकांची भावना असते.
त्यामुळे सध्या कमी वयात अनेक मुला-मुलींच्या हातात इंटरनेटच्या भरपूर
डाटासह महागडा स्मार्टफोन देण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून शालेय,
कनिष्ठ महाविद्यालयीन मुला-मुलींच्या हातात स्मार्टफोन दिसत आहेत. शाळेत सुरू करण्यात आलेला "लैंगिक शिक्षण' हा विषय "गुड टच, बॅड टच'पुरताच मर्यादित राहिला. या वयातील मुलांची उत्सुकता ताणली जात असल्याने ते सहज कुठेही पाहता येणाऱ्या पोर्न साईटकडे ओढले जात आहेत. लहान वयात अशा व्हिडिओमुळे त्याचे भयंकर परिणाम वयाच्या पंचवीशीनंतर दिसतील आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्यात लैंगिक समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी पालकांनीच आता जागरुक राहण्याची व मुलांशी मोकळेपणाने संवाद साधण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्‍त केले.

मराठवाड्यातल्या एका मोठ्या शहरात राहणारा दहावीच्या वर्गात शिकणारा
मुलगा. त्याच्या डोक्‍यात सतत विचार येतात की "तो शाळेत लवकर गेला आहे, वर्गात एक मुलगी, दोघेच असल्याने त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला आणि पोलिस त्याला पकडून नेत आहेत. काही दिवसांपूर्वी एका मॉलमध्ये कपडे घेण्यासाठी गेल्यानंतर तो चेंजींग रुममध्ये गेला असता तिथे लावलेल्या फोटोतील मॉडेल तिथे येऊन त्याच्याशी संबंध प्रस्थापित करत असल्याचा भास होतो. दुसरीकडे घरचे म्हणतात कोणाला सांगू नको, कोणात जास्त मिसळत जाऊ नकोस.' त्या मुलाचे म्हणणे ऐकून मानसोपचारतज्ञांनी त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु केले आहेत. मानसोपचारतज्ञांनी सांगितले, की त्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार शाळेत शिकवत असताना असे काही वाक्‍य आले तेव्हा शिक्षकांनी तो भाग वगळला आणि घरी वाचून घ्या असे सांगितले. यामुळे त्याची उत्सुकता वाढत गेली आणि पोर्न व्हिडिओ पहात गेल्याचे त्या दहावीतील मुलाने सांगितले. "चाईल्ड पोर्नोग्राफी' हा एक "सायबर क्राईम'चा प्रकार आहे.

लैंगिक शिक्षण नावालाच
इयत्ता 7 वी ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण हा विषय
अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या एका शाळेचे मुख्याध्यापक नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले, की कोणताही विषय शिकवताना त्याचे आधी टाचण तयार करावे लागते. अशा प्रकारच्या विषयाचे जिल्ह्यात कुठेही टाचण केले नसावे. यामुळे हा विषय कुठेच शिकवला जात नाही , लैंगिक शिक्षण कागदावरच आहे. फार फार तर "गुड टच, बॅड टच' एवढेच सांगितले जाते.

लैंगिक शिक्षण देण्याची संकल्पना उत्तम आहे पण ते कागदावरच आहे.
विद्यार्थ्यांशी संबंधित शिक्षकाने मोकळेपणाने चर्चा करुन विशिष्ट वयात
होणारे शारीरीक बदल, त्याचे परिणाम, संयमी वृत्ती, आरोग्याविषयी माहिती दिली तर मुले कुतुहलापोटी अशा प्रकारच्या व्हिडिओच्या आहारी जाणार नाहीत.

तज्ज्ञ म्हणतात...
डॉ. संजय शिंदे (सायबर क्राईम विषयाचे अभ्यासक) : चाईल्ड पोर्नोग्राफी हा
सायबर क्राईमचा प्रकार आहे. शाळेत लैंगिक शिक्षण सक्‍तीचे असले तरी तिथे शिकवले जात नाही. त्यामुळे मुलांची उत्सुकता ताणली जाते. शाळेत काही आंबटशौकीन मुले असतातच, ते आपण हे पाहिले ते पाहीले असे सांगून मग इतरही मुले त्यात ओढली जातात. सायबर गुन्हेगार असे व्हिडिओ पसरवतात मग आकर्षण वाढत जाते आणि नंतर त्या मुलांना ब्लॅकमेल केले जाते. तर कधी असे व्हिडिओ पाहण्याच्या आहारी गेलेल्या मुलांकडून छेडछाड, बळजबरी करणे, अपहरण, बलात्कार असे प्रकार घडतात. इंटरनेटने जग जवळ आले आहे त्याबरोबर पाश्‍चिमात्यांची संस्कृतीही लवकर इकडे येत असून त्यातून असे प्रश्‍न निर्माण होत आहेत. पालकांनी मुलांना लहान वयाचे असेपर्यंत संपर्कासाठी फक्त साधा फोन द्यावा.

बालमानसिकतेवर परिणाम
डॉ. प्रदीप देशमुख (बाल मनोविकारतज्ज्ञ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय) : लहान वयात नको ते पाहिल्याने मुलांमध्ये विकृती निर्माण होते. पोर्न व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जे प्रत्यक्षात शक्‍य नसते. भावनिक नियंत्रण राहत नाही. कमी वयातच खूप पोर्न व्हिडिओ पाहिल्याने "त्याविषयी'चे आकर्षण कमी होत जाते. यातून विकृती निर्माण होतात. अति कामातूर होतात आणि जे सुख मिळायला पाहीजे ते मिळत नसेल तर मग व्यसनाकडे वळतात. यामुळे प्रजननक्षमतेवर किती परिणाम होतो किंवा नाही याविषयी अधिक संशोधन झालेले नाही. मात्र, सुखी वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात हे निश्‍चित. लहान वयात असे पोर्न व्हिडिओ पाहिल्याने मेंदूतही रचनात्मक बदल होत जातात, ते बदल असे असतात की, असे व्हिडिओ पाहिल्याने थोड्यावेळासाठी त्यांना आनंद मिळतो मात्र सतत अशा प्रकारच्या साईटसवर व्हिडिओ पहात राहिल्यास नैसर्गिक आनंद, सुखापासून ते हळूहळू दुरावत जातात. आमच्याकडे विवाहानंतरच लैंगिक समस्या असणारे रुग्ण येतात.

इंटरनेट स्वस्त झाल्याने अशात याचे पेव फुटले आहे. आज लहान वयात पोर्न साईटस्‌ पाहणाऱ्या रुग्णांची भविष्यात संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.

पाल्याच्या वागण्याकडे नीट लक्ष द्या
डॉ. संदीप शिसोदे (मानसोपचारतज्ज्ञ, मनोविकृतीशास्त्र विभाग, शासकीय
वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय) : प्रत्येक पालकाने आपला मुलगा काय करतो, याकडे लक्ष दिले पाहिजे. जेवढे काही मनोविकार आहेत त्यापैकी 25 टक्‍के मनोविकृती 12 ते 15 वर्षे या वयातच जडतात आणि त्याचे परिणाम त्यांच्या वयाच्या 25 व्या वर्षानंतर दिसायला लागतात. त्यांच्या
अभ्यासावर परिणाम होणार होतो, कारण सतत त्यांच्या मनात पोर्नविषयी विचार येत राहतात. शासनानेच काही पोर्न साईटसवर बंदी घातली ती अतिशय योग्य आहे.

पाल्य वेगळे वागत असेल असे लक्षात आले तर जर त्याला नीटपणे समजावून सांगावे. ते जमत नसेल तर मानसोपचारतज्ञाकडे घेऊन जावे. शाळेत शिक्षकांनीही मोकळेपणाने बोलावे, सांगावे. शिक्षक तो भाग शिकवण्याऐवजी तुम्ही वाचून घ्या असे सांगून मोकळे होतात यातून त्यांच्यात क्‍युरॅसिटी निर्माण होते आणि त्यातुन मुले लपून छपून लैंगिकतेविषयी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात या साईटसकडे ओढले जातात. महिन्याला सरासरी 50 अशी मुले येतात ज्यांच्या मुळाशी गेल्यानतंर त्याचे कारण "असे' व्हिडिओ पाहिल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com