फेरभरण नसल्याने पावसाळ्यातही बोअर पडू लागले कोरडे

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

लातूरः शहराला 2015-16 मध्ये भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. रेल्वेने पाणी आले. यावर्षी पावसाने पाठ फिरविली आहे. पाऊस नसल्याने तशीच परिस्थिती निर्माण होत आहे; पण गेल्या तीन-चार वर्षांत महापालिकेने यातून काहीही धडा घेतला नाही. पाण्याचे नियोजन नाही. नागरिकांनी जलफेरभरण करावे याचे प्रबोधन नाही. इतकेच नव्हे, तर महापालिकेच्या एक हजार 464 बोअरचे जलफेरभणही केलेले नाही. पावसाळ्यातही हे बोअर आता कोरडे पडू लागले आहेत. यात महापालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासनाची उदासीनता सातत्याने दिसून येत आहे.

विभागीय आयुक्तांनी दखल घेतल्यानंतर तरी महापालिका बोअरचे जलफेरभरण करणार का, हा प्रश्न आहे. 
महापालिकेच्या वतीने आठ-दहा दिवसांतून एकदा नळाला पाणीपुरवठा केला जातो. पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिका मिनी वॉटर सप्लाय स्कीम म्हणजेचे बोअरकडे पाहते. शहरात सध्या महापालिकेचे एक हजार 464 बोअर आहेत. त्यापैकी एक हजार 28 बोअरवर पॉवर पंप बसविण्यात आले आहेत.

यापैकी पाणी नसल्याने 167 बोअर बंद पडले आहेत. पावसाळ्यात पाणी कमी झालेल्या बोअरची संख्या 646 आहे. 353 हातपंपांपैकी 264 हातपंप बंद पडले असून केवळ 89 सुरू आहेत. एकूणच पावसाळ्यात ही मिनी वॉटर सप्लाय स्कीम ऑक्‍सिजनवर आहे. 

ना प्रबोधन, ना कार्य 
शहराला सातत्याने टंचाईला सामोरे जावे लागत आहे. असे असताना महापालिकेकडून जलफेरभरणाच्या कामासाठी सातत्याने नागरिकांत प्रबोधन होण्याची गरज आहे; पण महापालिकेकडून असा उपक्रम राबविला जात नाही. इतकेच नव्हे, तर स्वतःच्या बोअरच्या फेरभरणाकडेही दुर्लक्ष केले जात आहे. याचा परिणाम पावसाळ्यात बोअर कोरडे पडू लागले आहेत. 

विभागीय आयुक्तांकडून दखल 
महापालिका जलफेरभरणाच्या कामात काहीच करीत नाही, याची दखल विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतली आहे. येथे घेतलेल्या बैठकीत त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणीही केली. येत्या काही दिवसांत भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली सर्वच बोअरचे फेरभरण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. बैठक होऊन तीन दिवस झाले तरी महापालिकेला अद्याप जाग आलेली नाही. 

ग्रीन बेल्टवर हवेत रिचार्ज शाफ्ट 
बोअर फेरभरणासोबतच शहरात ओपन स्पेस आणि ग्रीन बेल्ट मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणी महापालिकेने रिचार्ज शाफ्ट घेतले तर त्याचा शहरातील पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. कमी खर्चात ही चांगली उपाययोजना आहे. यासोबतच शहरातील बारव, विहिरी, आड यांच्या फेरभरणाकडेही महापालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com