यांच्यामुळे मिळतेय मराठी भाषेला बळ

File photo
File photo

नांदेड :  मराठी, उर्दू शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस खालावत आहे. पण, बालरक्षकांच्या प्रयत्नांमुळे इंग्रजीचा प्रभाव पडूनही ग्रामीण भागातील मराठी शाळांच्या पटसंख्येत मोठ्याप्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. नांदेड जिल्‍ह्यामध्ये १५० बालरक्षकांच्या माध्यमातून १७७ विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेले आहेत.  

इंग्रजी शाळांच्या गर्दीमध्ये मराठी शाळांचा श्‍वास दबल्या जात होता. आजही दबल्या जातच आहे.  परिणामी, मराठी शाळांवर गंडांतर येऊन अनेक शिक्षकांना अतिरिक्त व्हावे लागले होते. त्यामुळे नोकरी टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांनी तर पुढाकार घेतलाच आहे, शिवाय ग्रामस्थही आता जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पुढे येताना दिसत आहेत. गतवर्षीपासून मराठी शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वितरणासोबतच मराठी भाषा आणि संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले जात आहे. ग्रामीण भागातून ‘‘चला इंग्रजी शिकू या’’, ‘मला बोलू द्या’, ‘व्यसनमुक्तीचा निर्धार’, ‘व्यक्तिमत्व विकासवर्ग’, ‘प्रत्येक मुल माझ मुल’, ‘गृहभेटी’ अशा अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांना ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा जिवंत होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. 

युवकांचा सर्वाधिक पुढाकार

अनेक गावांमध्ये युवकांनी पुढाकार घेऊन शाळा बाह्य विद्यार्थ्यांना घेऊन मराठी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीचे वर्ग सुरु करणे, चांगला गणवेश वाटप करणे, इंग्रजी शाळांसारख्या सुविधा उपलब्ध करून देणे आदी उपक्रम सातत्याने राबवित असल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांत मुलांची संख्या वाढता दिसत आहे. असाच प्रकार शहरातही होणे आवश्‍यक आहे. इंग्रजीचे आक्रमण थोपवून धरण्यासाठी युवा वर्गालाच पुढाकार घ्यावा लागणार असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.  

मराठीच्या विकासासाठी धडपड

जिल्हा परिषद शाळेतील काही शिक्षक शाळांच्या विकासासाठी झटत आहेत तर काही केवळ वेतन मिळविण्यासाठी शाळेत येत असल्याचे वास्तव आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या काही शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तर काही शिक्षकांच्या प्रयत्नामुळे अनेक शाळा नव्याने जोर धरत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी काही शिक्षकांची असलेली तळमळ खरच वाखाणण्याजोगी आहे. असाच प्रयत्न सर्वच मराठी शाळा वाचविण्यासाठी शिक्षकांनी करण्याची गरज असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.  

बालरक्षकांचे हे यश
‘‘बालरक्षक चळवळ महाराष्ट्रात परिणामकारक कार्य करीत आहे. जिल्ह्यातील १५० प्रशिक्षित बालरक्षकांच्या प्रयत्नातून वंचित, दुर्लक्षित, भटके अशा एकूण १७७ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. तसेच शाळेतील पटसंख्या वाढीसोबतच गुणवत्तावाढीसाठीही त्यांची मदत होत आहे’’.  
- प्रशांत दिग्रसकर (शिक्षणाधिकारी प्राथमिक)

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com