चिखलामुळे विद्यार्थ्यांना परतावे लागले घरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

उंडणगाव (ता.सिल्लोड) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या प्रांगणात अजूनही गारा (चिखल) व पाणी साचलेले आहे. त्यामुळे प्रांगणातील चिखलाचा फटका शाळेला पहिल्याच दिवशी बुधवारी (ता.13) बसला. अनेक विद्यार्थ्यांना यामुळे वर्गात जाण्यास रस्ताच नसल्याने घरी परतावे लागले.

उंडणगाव (जि.औरंगाबाद) ः उंडणगाव (ता.सिल्लोड) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या प्रांगणात अजूनही गारा (चिखल) व पाणी साचलेले आहे. त्यामुळे प्रांगणातील चिखलाचा फटका शाळेला पहिल्याच दिवशी बुधवारी (ता.13) बसला. अनेक विद्यार्थ्यांना यामुळे वर्गात जाण्यास रस्ताच नसल्याने घरी परतावे लागले.

परतीच्या पावसाने परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शाळेच्या प्रांगणालगतच पाणी वाहून जाण्यासाठी चारी खोदलेली आहे. या चारीत भरून पाणी अजूनही आहे. तेच पाणी शाळेच्या प्रांगणात जागोजागी पसरले आहे. त्यामुळे प्रांगणात दलदल झाली असून पाय ठेवणे जिकरीचे बनले आहे.
बुधवारी हा दिवस दिवाळी सुटीनंतरच शाळेचा पहिला दिवस. याच दिवशी चक्क शाळेत जायला रस्ताच नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली. शाळेत शिक्षक वर्गावर आले असताना फक्त आणि फक्त वर्गात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने विद्यार्थ्यांना घरी परतावे लागले. 11 शिक्षक असलेल्या या शाळेत मराठी माध्यमाचे पहिली ते चौथी, तर उर्दू माध्यमाचे पहिली ते सातवीपर्यंत शिक्षणाचे धडे गिरविले जातात. शेकडो विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात.

सुटीतील गंमती-जमती !
दिवाळी सणाची पंधरा दिवसाची सुटीत मौजमजा केली. ना शाळा ना अभ्यासाचा ताण होता. सुटीच्या काळात काय-काय केले कशी धमाल केली. मामाच्या गावाला मारलेली फेरी, फराळाचा आनंद अजून बरेच काही प्रसंग घडतात. हीच केलेली मौज-मजा शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी आपल्या मित्रांशी शेअर करतात. मात्र पहिल्याच दिवशी गारा व पाण्यामुळे शाळा भरली नाही. त्यामुळे दिवाळी सणातील गंमती-जमती विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गमित्रांना सांगता आले नाही.

सतत पाऊस पडल्याने शाळेच्या प्रांगणात चिखल झाला आहे. चारीचे पाणी प्रांगणात आल्याने ही समस्या उभी राहिली आहे. वरिष्ठांकडे व ग्रामपंचायत कार्यालयाकडे सदरील कैफियत मांडली आहे.
- शेषराव सोनवणे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due To Mud Students Not Come