नदीचे खोलीकरण, रुंदीकरणामुळे रस्ता बंद

परमेश्वर काेकाटे
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

पैठणखेडा (ता. पैठण) येथील तीस ते पस्तीस शेतकऱ्यांचा शेतावर येण्या-जाण्याचा रस्ता नदीचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यामुळे बंद झाला आहे. रस्त्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन दोन महिने झाले, अद्यापही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे शेतीची मशागत व पेरणी थांबली आहे.

चितेगाव (जि.औरंगाबाद) : पैठणखेडा (ता. पैठण) येथील तीस ते पस्तीस शेतकऱ्यांचा शेतावर येण्या-जाण्याचा रस्ता नदीचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यामुळे बंद झाला आहे. रस्त्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन दोन महिने झाले, अद्यापही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे शेतीची मशागत व पेरणी थांबली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान योजनेत सहभागी असलेल्या परिसरात अनेक सामाजिक योजना राबविल्या जात आहेत. त्यानुसार परिसरातील नदी-नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले आहे. खोलीकरण व रुंदीकरण केल्यामुळे नदीनाल्यातील सार्वजनिक रस्ते नदीच्या दोन्ही बाजूने झाले. परंतु, पैठणखेडा गावाच्या पश्‍चिमेस असलेल्या नदीचेही खोलीकरणचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे सहाजिकच नदीपात्रातील माती बाजूने टाकून रस्ता दोन्ही बाजूने करण्यात आला.

परंतु, पश्‍चिम बाजूस मुख्य रस्ता चितेगाव-इमामपूर रस्त्याला लागून असलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्याचा मातीचा भराव काढून सार्वजनिक रस्ता बंद केला आहे. त्यामुळे पुढे जाणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचा रस्ता बंद झाला आहे. सदरील शेतकऱ्यास अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय पैठण यांना दोन महिन्यांपूर्वी लेखी निवेदन दिले.

निवेदन देऊन दोन महिने झाले अद्यापही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांची शेती पडीक पडली असून शेतीची मशागत व पेरणी थांबली आहे. या रस्त्याने ये-जा करणारे शेतकरी आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून खरीप हंगाम सुरू असल्यामुळे रस्त्याअभावी शेतात पेरणी झाली नाही. अद्यापही प्रशासनाने या रस्त्याची दखल घेतली नाही. कृष्णा चावरे, बबन कोकाटे, गोरख पितळे, हरिचंद्र धुमाळ यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे रस्त्याची मागणी केली आहे. याबाबत मंडळ अधिकारी महसूल बिडकिन संभाजी थोटे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी सांगितले, की संबंधित रस्त्याचा पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयास पाठविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due To River Deepening, Widening Road Closed