esakal | बनावट खत आढळल्याप्रकरणी कृषी केंद्रचालकाविरुद्ध गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

ढोरेगाव (ता. गंगापूर) ः योगेश कृषी सेवा केंद्राची बनावट खतप्रकरणी झाडाझडती घेताना आशिष काळुसे, रामकृष्ण पाटील आदी.

बनावट खत आढळल्याप्रकरणी कृषी केंद्रचालकाविरुद्ध गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शेंदूरवादा, ता. 25 (जि.औरंगाबाद) : बनावट खत आढळल्याप्रकरणी ढोरेगाव (ता. गंगापूर) येथे कृषी सेवा केंद्रचालक, पुरवठादार व सम्राट फर्टिलायझर्स भावनगर, गुजरात यांच्याविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात जीवनावश्‍यक वस्तू व खत नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.


योगेश कृषी सेवा केंद्र ढोरेगाव (ता. गंगापूर) येथून बनावट डीएपी खत विक्री होत असल्याची माहिती मिळताच जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक आशिष काळुसे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी रामकृष्ण पाटील यांनी केंद्राची तपासणी केली. या केंद्रांमधून बनावट डीएपी खत शेतकऱ्यांना कच्च्या बिलाद्वारे विक्री झालेले आढळून आले. केंद्राचे मालक योगेश शिंदे यांनी अंकुश दुबिले (रा. नागापूर, ता. गंगापूर) यांच्याकडून सदर खत खरेदी केल्याचे सांगितले. हे खत सम्राट फर्टिलायझर्स भावनगर, गुजरात या कंपनीचे असल्याची माहितीही त्यांनी दिली.

गोदामाचे तपासणी केली असता सम्राट डीएपी नावाने बनावट खत आढळून आले. त्यामुळे योगेश कृषी सेवा केंद्र चालक योगेश सुभाष शिंदे, पुरवठादार अंकुश दुबिले, सम्राट फर्टिलायझर्स भावनगर गुजरात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. योगेश शिंदे, अंकुश दुबिले या दोघांना अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे करीत आहेत.


ढोरेगावचा प्रकार लक्षात घेता गंगापूर तालुक्‍यातील सर्वच कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- रामकृष्ण पाटील, तालुका कृषी अधिकारी.

loading image
go to top