अशा खपवतात बनावट नोटा, चलनात होते भेसळ

Money
Money

औरंगाबाद -  नोटाबंदीनंतर बनावट नोटांना ब्रेक लागेल असा दावा सरकारकडून झाला होता; परंतु चलनबदल होऊनही आता ठिकठिकाणी बनावट नोटांचा बाजारात सुळसुळाट आहे. जुन्याच पद्धतीने तंत्राचा वापर करून नव्या नोटा तयार केल्या जात आहेत. परिणामी, चलनातील नोटांच्या भेसळीमुळे सामान्यांची आर्थिक गणितेही बिघडण्याची चिन्हे आहेत. 
  
अशा तयार होतात बनावट नोटा 
औरंगाबादेत पकडलेल्या संशयितांची चौकशी केल्यानंतर मोठी माहिती समोर आली. त्यांनी उच्च प्रतीचे मल्टिपल युजेसचे कलर प्रिंटर खरेदी केले होते. त्यात एकावेळी एक खरी नोट स्कॅन केली. नंतर एकावेळी त्याच क्रमांकाच्या तीन नोटा रॉयल एक्‍झिक्‍युटिव्ह बॉंडपेपरवर स्कॅन केल्या. नोटांचा आकार असेल अशा पद्धतीने त्या कटरने कापल्या. त्यावर हस्तकलेसाठी वापरण्यात येणारी हिरव्या रंगाची पट्टी नोट खरी भासविण्यासाठी लावली. 
 
उत्सवात खपवतात नोटा 
सण, उत्सवांच्या तोंडावर बाजारात तेजी असते. खरेदीसाठी मोठी झुंबड उडालेली असते. अशा घाईगडबडीच्या काळात एजंटांमार्फत नोटा बाजारात पाठविल्या जातात. खासकरून आठवडे बाजार, छोटी-छोटी दुकाने लक्ष्य केली जातात. खऱ्या नोटांच्या बंडलात बनावट नोटाही दिल्या जातात. यासाठी वीस ते तीस टक्के वाटाही एजंट घेतात, असे प्रकार मराठवाड्यात घडले. 
 

अशी आहे मोड्‌स 
दुकानात खरेदीसाठी ग्राहक बनून जायचे. त्यानंतर नाममात्र खरेदी करायची. चलनातील पाचशे अथवा दोन हजारांची हुबेहूब बनावट नोट दुकानदाराला द्यायची. दुकानदार घाईगडबडीत ती नोट स्वतःकडे ठेवून उरलेली रक्कम ग्राहकाला देतो. अर्थात दिलेली रक्कमच तोतया ग्राहकासाठी मिळकत ठरते. 
 


अंबडमध्ये काय घडले? 
एका कापड दुकानात ग्राहक खरेदीसाठी गेला, त्यावेळी त्याने दोन हजारांची नोट दुकानदाराला दिली; परंतु ती नोट बनावट असल्याचे लक्षात येताच त्या ग्राहकाची दुकानदाराने झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे नऊ बनावट नोटा आढळल्या होत्या. यानंतर बॅंकेनेही दक्षता घेण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. 
 
 

बनावट नोटांवर पाण्याचा थेंब पडला तर रंग पांगतो. खऱ्या नोटेत असे होत नाही. तसेच बनावट नोटा मोजताना त्या हाताला चिकटतात. अशा बाबी बनावट नोटा तयार करणाऱ्या संशयितांच्या चौकशीतून समोर आल्या. या नोटांसाठी औरंगाबाद व इतर ठिकाणांहून साहित्य सामग्री खरेदी केली जात असल्याचे समोर आले आहे. 
- घनश्‍याम सोनवणे, पोलिस निरीक्षक. 


अशी ओळखा खरी नोट
 


शंभरची नोट 

  • शंभर रुपयांच्या खऱ्या नोटेच्या समोरील भागात देवनागरी लिपीत 100 हा आकडा आहे. 
  • खऱ्या नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधी यांचे छायाचित्र असून, लहान अक्षरांमध्ये आरबीआय, भारत, इंडिया आणि 100 असे आहे. त्यासोबतच या नोटेवर एक सिक्‍युरिटी थ्रेडही आहे. ज्यावेळी ही नोट दुमडली जाईल तेव्हा त्या हिरव्या थ्रेडचा रंग निळा होईल. 
  • नोटेच्या मागच्या भागात तिचे छपाईचे वर्ष, स्वच्छ भारत अभियानाचा लोगो, भाषा पॅनेल, राणी की बावडी या ठिकाणाचं चित्र आहे. 


दोन हजारांची नोट 

  • सगळ्यात आधी नोटेला लाईटच्या समोर आणि डोळ्यांच्या 45 डिग्रीच्या अँगलमध्ये पकडा. त्यावर तुम्हाला 2000 लिहिलेले दिसेल. 
  • 2000 हे देवनागरी लिपीमध्ये असेल. त्याचबरोबर मध्यभागी महात्मा गांधींचा फोटोदेखील दिसला पाहिजे. तरच ती नोट खरी आहे. 
  • खऱ्या नोटेवर छोट्या अक्षरांत आरबीआय आणि 2000 असे लिहिले असेल. 
  • खऱ्या नोटेवर सिक्‍युरिटी थ्रेड आहे. त्यावर भारत, आरबीआय आणि 2000 लिहिले आहे. यात आणखी एक म्हणजे नोट थोडीशी तिरक्‍या बाजूने फिरवा, त्यावेळी नोटेचा रंग हिरव्यातून निळा होताना दिसेल. 
  • खऱ्या नोटेवर गॅरंटी क्‍लॉज, गव्हर्नरची स्वाक्षरी, प्रॉमिस क्‍लॉज आणि आरबीआयचा लोगो डाव्या बाजूला आखण्यात आला आहे. 


पाचशेची नोट 

  • 500 हे देवनागरी लिपीत असते. 
  • मध्यभागी महात्मा गांधी यांचे चित्र. 
  • प्रकाशात नोट आडवी धरल्यास नोटेवरील हिरवी तुटक पट्टी निळी दिसते. 
  • उजव्या बाजूचे क्रमांक लहानापासून मोठे होत जातात. 
  • अशोकस्तंभ चिन्ह, नोटेच्या मागील बाजूला लाल किल्ला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com